भारतात सुरू असलेल्या करोना लसीकरण मोहिमेने मंगळवारी आणखी एका विक्रमाची नोंद केली. आता प्रत्येक चार लाभार्थींपैकी एका भारतीयाचे पूर्ण लसीकरण झाले आहे. कोविड -१९ लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर आठ महिन्यांनी, भारतात मंगळवारी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या आता अंदाजे २५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, मंगळवारी ५३ लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले. ज्यामुळे देशातील लसीकरणाची संख्या एकूण संख्या ८७.५९ कोटी झाली.

मंगळवारच्या लसीकरणासह, अंदाजे एकूण पात्र लोकसंख्येच्या ६८ टक्के लोकांना त्यांचा पहिला डोस मिळाला आहे आणि २४.६१ टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. भारताने सध्या करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्याही सहा महिन्यांहून अधिक काळानंतर ३ लाखाच्या खाली आली आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतातील पात्र लोकांना करोना लसीचे ८७.६२ कोटी डोस देण्यात आले आहेत. चीननंतर भारतात जास्तीत जास्त लोकांना कोविड लसीचा एक डोस मिळाला आहे.

प्रौढ लोकसंख्येच्या जवळजवळ एक चतुर्थांश लोकांचे पूर्णपणे लसीकरण केल्याने सार्वजनिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम दिसून येत आहे. आकडेवारीनुसार दुसर्‍या डोसनंतर मृत्यू रोखण्यात लसीचा प्रभाव वाढला आहे आणि मृत्यूपासून जवळपास (९७.५ टक्के) एकूण संरक्षण मिळते.

“हे स्पष्ट आहे की साथीच्या आजाराविरूद्धच्या लढ्यात आपण वापरत असलेल्या साधनांपैकी लसीचे साधन आहे, जे आपल्याला मृत्यूपासून संरक्षण करणारी सर्वात महत्वाची ढाल आहे. हे देखील स्पष्ट आहे की जर आपण दोन डोस दिले तर गंभीर रोग आणि मृत्यूपासून संपूर्ण संरक्षण मिळत आहे. यामुळे परिस्थिती खूपच बदलेल, ” असे भारताच्या कोविड -१९ टास्क फोर्सचे प्रमुख डॉ व्ही के पॉल यांनी सांगितले होते.

ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या चार मोठ्या राज्यांनी सहा कोटींहून अधिक लसीकरण केले आहे. यापैकी तीन मोठ्या राज्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुसरा डोस घेण्याचे प्रमाण जास्त आहे. गुजरात (४० टक्के), मध्य प्रदेश (२७ टक्के) आणि महाराष्ट्र (२६ टक्के) असे हे प्रमाण आहे. उत्तर प्रदेशात प्रौढ लोकसंख्येच्या फक्त १३.३४ टक्के लोकांना दोन्ही डोस दिले आहेत. पश्चिम बंगाल, राजस्थान, कर्नाटक आणि बिहारमध्ये ५ कोटींहून अधिक लसीकरण झाले आहे.