अमेरिकेतील आव्हान; रुग्णालयांवर मोठा ताण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा करोनाच्या डेल्टा विषाणूच्या वाढत्या रुग्णांवर उपचार करण्याची पराकाष्ठा करीत असतानाच आता याच विषाणूचे ओमायक्रॉन हे नवे अत्यंत वेगाने प्रसार होणारे उत्परिवर्तन नवे आव्हान म्हणून उभे ठाकले आहे.

करोना रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे ओहिओ राज्यात आरोग्य सेवकांच्या मदतीसाठी नॅशनल गार्डला पाचारण करण्यात आले आहे. नाब्रास्कामधील तज्ज्ञांनी म्हटले आहे की, येथील रुग्णालयांत प्रवेश देण्यासाठी लवकरच नियमन यंत्रणा उभारावी लागेल. कान्सास आणि मिसुरीमधील अनेक डॉक्टरांनी रुग्णांवरील शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्या आहेत. त्यांना आरोग्यसेवकांचा तुटवडा भासत आहे. रुग्णसंख्या दुपटी-तिपटीने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. डेट्रॉईटमधील हेन्री फोर्ड आरोग्य यंत्रणेचे आपत्कालीन वैद्यकीय सेवा तज्ज्ञ डॉ. जॅकलिन फ्लायम-कार्लसन म्हणाले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू होणार असतील तर त्याला सामोरे जाण्याची क्षमता कोणत्याही आरोग्य सेवकांत नाही. तशी वेळ येण्याची चिन्हे आहेत.

अमेरिकेत करोनाबाधित हे रुग्णालयांत दाखल होण्याचे गेल्या सात दिवसांतील सरासरी प्रमाण बुधवारी ६० हजार इतके होते. हे प्रमाण गेल्या हिवाळ्यात करोनाची लाट शिखरावर होती, त्याच्या तुलनेत कमी असले तरी नोव्हेंबर आरंभीच्या रुग्णसंख्येच्या ५० टक्के अधिक आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. शीत हवामान असलेल्या राज्यांत हे प्रमाण अधिक आहे. या प्रदेशांत लोकांचे बंदिस्त ठिकाणी जमण्याचे प्रमाण जास्त असल्याने संसर्ग वाढत आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या शनिवारच्या वृत्तानुसार, गेल्या २४ तासांत २१ हजार ९०० हून अधिक जणांची करोना चाचणी होकारात्मक आली. मोठ्या प्रमाणावर चाचण्या सुरू झाल्यानंतरही ही सर्वाधिक संख्या आहे. सध्या रुग्णसंख्या वाढत असल्याने न्यूयॉर्क शहरातील सांस्कृतिक-संगीत कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत किंवा आभासी पद्धतीने होत आहेत.

अमेरिकेत सध्या अशी स्थिती आहे की, करोनाच्या डेल्टा विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येचा आम्ही मुकाबला करीत आहोतच, पण त्याबरोबरच ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तनाचा धोकाही आमच्यापुढे आहे.

-डॉ. अ‍ॅथनी फौची, अमेरिकेच्या अध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus delta virus omicron virus patient positive test akp
First published on: 20-12-2021 at 00:55 IST