देशातील करोना विषाणूची ताकद हळूहळू कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, याबाबत एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. करोना व्हायरसचं भारतातील आर मूल्य अर्थात आर व्हॅल्यू ही १ च्या खाली आली आहे. आर व्हॅल्यू हे एक परिमाण आहे. याद्वारे देशात करोना व्हायरसचा संसर्ग किती वेगाने पसरत आहे हे मोजलं जातं. संशोधकांच्या मते, आर-व्हॅल्यू करोना विषाणू किती वेगाने पसरतो हे दर्शवते. दिलासादायक बाब अशी की, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत देशातील आर व्हॅल्यू ०.९२ वर आली आहे.

कोणत्याही राज्याची आर-व्हॅल्यू किती?

देशातील प्रमुख शहरं मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरूमधील आर-व्हॅल्यू १ पेक्षा जास्त आहेत. तर दिल्ली आणि पुण्यात आर-व्हॅल्यू १ पेक्षा कमी आहे. राज्यांचा विचार करता महाराष्ट्र आणि केरळमध्ये आर-व्हॅल्यू ही १ पेक्षा कमी आहे. मात्र, यापूर्वी याच दोन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाची प्रकरणं नोंदवली गेली होती. तर, करोनाच्या सर्वात जास्त सक्रिय प्रकरणांच्या नोंदीदेखील या दोन राज्यांमध्ये झाल्या होत्या.

महाराष्ट्र आणि केरळची रुग्णसंख्या काहीशी नियंत्रणात

ऑगस्टच्या अखेरीस देशाची आर-व्हॅल्यू १.१७ इतकी होती. तर ४ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान ही आर-व्हॅल्यू १.११ वर आली होती. तेव्हापासून सातत्याने देशाची आर-व्हॅल्यू ही १ च्या खाली आली आहे. ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान देशाची आर-व्हॅल्यू ही ०.८६ होती. खरंतर, महाराष्ट्र आणि केरळमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या प्रकरणांमुळे देशाची आर-व्हॅल्यू वाढली होती. मात्र, सध्या या दोन्ही राज्यांमध्ये करोनाची प्रकरणं कमी प्रमाणात नोंदवली जात आहेत.

चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेसच्या सीताभारा सिन्हा म्हणाल्या की, चांगली बातमी अशी आहे की भारताची आर-व्हॅल्यू केरळ आणि महाराष्ट्राच्या तुलनेत १ पेक्षा कमी आहे. या दोन्ही राज्यांत ही दोन राज्यं सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. सिन्हा या आर-व्हॅल्यूची गणना करणाऱ्या संशोधकांच्या टीमचं नेतृत्व करत आहेत. आकडेवारीनुसार, मुंबईची आर-व्हॅल्यू १.०९, चेन्नईची आर-व्हॅल्यू १.११, कोलकाता १.०४, बेंगळुरूची आर-व्हॅल्यू १.०६ इतकी आहे.