संयुक्त राष्ट्रे : भारतात ११ ते १७ ऑक्टोबर दरम्यान करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये १८ टक्के घट झाली असून मृत्यूही १३ टक्क्यांनी घटले आहेत, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. युरोपीय भाग वगळता जगात इतरत्र करोनाच्या साप्ताहिक रुग्णांची व मृतांची संख्या कमी होत असल्याचे सांगण्यात आले.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की ११ ते १७ ऑक्टोबर दरम्यान २७ लाख नवे रुग्ण सापडले असून ४६ हजार मृत्यू झाले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हे प्रमाण सारखेच आढळून आले आहे. युरोपीय भागात रुग्णात ७ टक्के वाढ झाली असून ती गेल्या आठवड्याच्या तुलनेत जास्त आहे. आफ्रिकन देशात १८ टक्के, पश्चिम पॅसिफिकमध्ये १६ टक्के रुग्ण कपात झाली आहे. मृत्यू संख्येत आफ्रिकेत २५ टक्के, अग्नेय आशिया व पूर्व भूमध्य भागात अनुक्रमे १९ व ८ टक्के कपात झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या २४ कोटी झाली असून मृतांची संख्या ४९ लाख झाली आहे. अमेरिकेत ५ लाख ८२ हजार ७०७ नवे रुग्ण सापडले असले तरी ११ टक्के घट आहे. ब्रिटनमध्ये २ लाख ८३ हजार ७५६ रुग्ण सापडले असले तरी १४ टक्के वाढ आहे. रशियात २ लाख १७ हजार ३२२ रुग्ण सापडले असून १५ टक्के वाढ आहे.

तुर्कस्तानात २ लाख १३ हजार ९६१ रुग्ण सापडले असून हे प्रमाण गेल्या आठवड्याइतकेच आहे. भारतात १ लाख १४ हजार २४४ रुग्ण सापडले असून १८ टक्के घट झाली आहे.