जागतिक करोनाबळींची संख्या सोमवारी ५० लाखांवर गेली आहे. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत करोनाच्या महासाथीने केवळ गरीब देशांनाच उद्ध्वस्त केले असे नाही तर प्रथम दर्जाच्या आरोग्य सेवा असणाऱ्या श्रीमंत देशांनाही कमकुवत केले आहे.

अमेरिका, युरोपियन महासंघ, ब्रिटन आणि ब्राझील हे सर्व उच्च, मध्यम, किंवा उच्च उत्पन्न असलेले देश एकत्रितपणे जगाच्या लोकसंख्येपैकी एक अष्टमांश आहेत. परंतु करोना मृत्यूंच्या नोंदवलेल्या संख्येपैकी जवळजवळ निम्मी संख्या या देशांतील आहे. फक्त अमेरिकेतच  ७ लाख ४० हजारांहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत, जे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहेत.

येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. अल्बर्ट को म्हणाले, ‘हा आपल्या आयुष्यातील एक मर्यादा स्पष्ट करणारा क्षण आहे. स्व संरक्षणासाठी काय करावे लागेल ज्यामुळे आणखी ५० लाखांचा बळी जाणार नाही, असा सवाल त्यांनी केला.

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या एकत्रित लोकसंख्येएवढी आहे. पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओस्लोच्या अंदाजानुसार, १९५० पासून विविध राष्ट्रांमधील लढाईत मारल्या गेलेल्या लोकांइतकीच करोनाबळींची संख्या आहे. जागतिक स्तरावर, हृदयविकार आणि पक्षाघातानंतर, करोना हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे.

मर्यादित चाचण्यांमुळे आणि विशेषत: भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये, वैद्यकीय उपचारांशिवाय लोक घरीच मृत्युमुखी पडल्याने एकूण करोनाबळींची संख्या ही निश्चितच कमी आहे.

करोनाचा उद्रेक सुरू झाल्यापासून २२ महिन्यांत करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेली स्थळे बदलली आहेत. सध्या, विषाणू रशिया, युक्रेन आणि पूर्व युरोपच्या इतर भागामध्ये अधिक प्रमाणात पसरत आहे. या भागांमध्ये अफवा, चुकीची माहिती आणि सरकारवरील अविश्वास या कारणांमुळे लसीकरणात अडथळा येत आहे. युक्रेनमध्ये, केवळ १७ टक्के प्रौढ लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे, तर अर्मेनियामध्ये, फक्त ७ टक्केच लसीकरण झाले आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीस भारतात डेल्टा विषाणूची लाट येऊन गेली असतानाही प्रभावी लसीकरणामुळे रशिया, अमेरिका किंवा ब्रिटनच्या तुलनेत भारतात दैनंदिन मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे.