नवी दिल्ली : देशातील रुग्णसंख्येत किंचित घट झाली असून गेल्या २४ तासांत १०,३०२ रुग्णांची नोंद झाली तर २६७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांत मोठी घट झाली असून ती १ लाख २४ हजार ८६८ नोंदल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जाहीर केले आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.३६ टक्के इतकी आहे. ही टक्केवारी मार्च २०२० नंतर इतकी कमी नोंदली गेली आहे. तर करोनामुक्त होण्याची टक्केवारी देखील ९८.२९ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.  गेल्या २४ तासांत  सक्रिय रुग्णांमध्ये १७५२ने घट झाली आहे. 

देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४४ लाख ९९ हजार ९२५ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ६५ हजार ३४९ झाली आहे. आतापर्यंत ३ कोटी ३९ लाख ०९  हजार ७०८ जण करोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत लसीकरण झालेल्यांची संख्या ११५.७९ कोटी झाली आहे.

जर्मनीत संपूर्ण टाळेबंदीची शक्यता

बर्लिन : जर्मनीत गेल्या काही दिवसांत करोनाचे रुग्ण वाढत असून ही राष्ट्रीय आणीबाणी असल्याचे मत आरोग्यमंत्री जेन्स स्पाह यांनी व्यक्त केले आहे. देशात सरसकट टाळेबंदी लागू करणार काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही अशा स्थितीत आहोत की कोणत्याही पर्यायाची शक्यता सध्या नाकारता येत नाही. जर्मन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने करोना प्रतिबंधाच्या नव्या उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. कनिष्ठ सभागृहात एक दिवस आधीच यासाठी मंजुरी देण्यात आली होती. सध्या देशातील एक चतुर्थांश जिल्ह्यांत एक लाख लोकसंख्येमागे करोना संसर्गाचे साप्ताहिक प्रमाण ५०० इतके असून अनेक रुग्णालयांची व्यवस्था अपुरी पडत आहे.