नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासांत ७,३५० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून एकूण करोनाबाधितांची संख्या तीन कोटी ४६ लाख ९७,८६० झाली आहे. सध्या ९१,४५६ उपचाराधीन रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने सोमवारी दिली.
गेल्या २४ तासांत २०२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या चार लाख ७५,६३६ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
सलग ४६ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या १५ हजारांखाली नोंदली गेली आहे. एकूण करोनाबाधितांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांची संख्या ०.२६ टक्के असून मार्च २०२० पासूनची ही सर्वात कमी संख्या आहे. करोनातून बरे होण्याचा दर ९८.३७ टक्के आहे. मार्च २०२० पासूनचा हा सर्वाधिक दर आहे. गेल्या २४ तासांत उपचाराधीन रुग्णांची संख्या ८२५ने कमी झाली आहे. दैनंदिन रुग्णवाढीचा दर ०.८६ टक्के इतका नोंदला असून सलग ७० दिवसांपासून रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. साप्ताहिक रुग्णवाढीचा दर ०.६९ टक्के नोंदला आहे. सलग २९ दिवसांपासून साप्ताहिक रुग्णवाढीचा दर एक टक्क्याहून कमी नोंदला गेला आहे.
देशभरात आतापर्यंत तीन कोटी ४१ लाख ३०,७६८ रुग्ण करोनामुक्त झाले असून मृत्युदर १.३७ टक्के आहे. देशभरात १३३.१७ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.