देशात गेल्या २४ तासांत ४५,९५१ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या ३ कोटी०३ लाख ६२ हजार ८४८ वर पोहोचली. करोना मृत्यूंची संख्या सलग तिसऱ्या दिवशी १ हजारांपेक्षा कमी राहिलेली आहे.

याच कालावधीत ८१७ जण करोनाने मरण पावल्यामुळे करोना मृत्यूंचा आकडा ३ लाख ९८ हजार ४५४ झाला आहे. गेल्या ८१ दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत आतापर्यंत करोना प्रतिबंधक लशीच्या एकूण ३३.२८ कोटी मात्रा देण्यात आल्या असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

करोनाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या ५ लाख ३७ हजार ०६४ पर्यंत कमी झाली असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढून ९६.९२ टक्के झाले आहे. देशात आतापर्यंत ४१ कोटी ०१ लाख ४४ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण सलग ४८व्या दिवशी करोनाच्या नव्या प्रकरणांपेक्षा अधिक होते. करोनाचा मृत्युदर १.३१ टक्के आहे.

गेल्या २४ तासांत मरण पावलेल्या ८१७ जणांमध्ये २३१ महाराष्ट्रातील, ११८ तमिळनाडूतील, तर १०४ कर्नाटकमधील आहेत.