देशात करोनाकाळात ४० लाख अतिरिक्त मृत्यू?

आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, तमिळनाडू आणि उत्तरप्रदेश या राज्यांतील अतिरिक्त मृत्यूनोंदणीचा आधार संशोधकांनी घेतला आहे

ताज्या अहवालामुळे मृतांच्या सरकारी आकडेवारीबाबत नव्या वादाची चिन्हे
देशातील करोनाबळींची अधिकृत संख्या ४,१४,००० आहे. मात्र, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत करोनाकाळात देशात ४० लाखांहून अधिक अतिरिक्त मृत्यू झाल्याचा अंदाज ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वांचाच करोनामुळे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नसला तरी करोनाने मृत्यूच्या सरकारी आकड्यापेक्षा अनेक पटींनी बळी घेतल्याचे संकेत या अहवालातून मिळाले आहेत.

अमेरिकास्थित ‘सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेन्ट’ संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. करोनाकाळाच्या सुरुवातीपासून तीन माहितीस्त्रोतांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, तमिळनाडू आणि उत्तरप्रदेश या राज्यांतील अतिरिक्त मृत्यूनोंदणीचा आधार संशोधकांनी घेतला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील वयानुसार मृत्युदर आणि भारतातील दोन सेरो सर्वेक्षणांची आकडेवारी पडताळण्यात आली आहे. शिवाय़, देशातील १,७७,००० घरांतील ८,६८,००० जणांचा समावेश असलेल्या ग्राहक सर्वेक्षणाचा आधार संशोधकांनी घेतला आहे. गेल्या चार महिन्यांतील या घरांतील सदस्यांच्या मृत्यूची नोंदही त्यात होते.

या सर्वांचा एकत्रित निष्कर्ष काढला असता, करोनाकाळात देशातील अतिरिक्त मृत्यूसंख्या ३४ लाख ते ४७ लाखांवर पोहोचते. ही संख्या देशाच्या करोनाबळींच्या अधिकृत आकड्याच्या दहापट आहे. मात्र, या सर्वांचाच करोनामुळे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नसून, करोनामुळे नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला, हे सांगणेही अवघड असल्याचे अरविंद सुब्रमणियन यांनी सांगितले.

 

सुब्रमणियन यांचा सहभाग

अमेरिकास्थित ‘सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेन्ट’ संस्थेने हा अहवाल तयार केला असून, देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन अहवालाचे सहलेखक आहेत. हार्वर्ड विद्यापीठाचे अभिषेक आनंद यांचेही या अहवालात योगदान आहे.

संशोधनात सुब्रमणियन यांचा सहभाग

अमेरिकास्थित ‘सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेन्ट’ संस्थेने हा अहवाल तयार केला असून, देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन अहवालाचे सहलेखक आहेत. हार्वर्ड विद्यापीठाचे अभिषेक आनंद यांचेही या अहवालात योगदान आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection corona positive patient corona death akp 94