करोनाचे ११,९०३ नवे रुग्ण, ३११ जणांचा मृत्यू

देशातील उपचाराधीन रुग्णांतही सातत्याने घट होत आहे. गेल्या २५२ दिवसांतील सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या मंगळवारी नोंदली गेली आहे. १ लाख ५१ हजार २०९ इतकी रुग्णसंख्या नोंदली गेली असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.४४ टक्के इतकी आहे. ही टक्केवारी मार्च २०२० नंतर इतकी कमी नोंदली गेली आहे. तर करोनामुक्त होण्याची टक्केवारीदेखील ९८.२२ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले आहे.

देशातील रुग्णसंख्येत किंचित चढउतार होत असून गेल्या २४ तासांत ११,९०३ रुग्णांची नोंद झाली तर ३११ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग २६ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही २० हजारांखाली तर सलग १२९ दिवसांपासून ५० हजारांखाली नोंदल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

 गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णांमध्ये २,५६७ ने घट झाली आहे. 

देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४३ लाख ०८ हजार १४० जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ५९ हजार १९१ झाली आहे. तर मृत्यू दर १.३४ टक्के नोंदला गेला आहे. आतापर्यंत ३ कोटी ३६ लाख ९७ हजार ७४० जण करोनामुक्त झाले आहेत.

दैनंदिन रुग्णवाढीचा दर १.११ टक्के इतका नोंदला असून गेल्या ३० दिवसांपासून रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. साप्ताहिक रुग्णवाढीचा दर १.१८ टक्के नोंदला आहे. सलग ४० दिवसांपासून साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. भारतात लसीकरण झालेल्यांची संख्या १०७.२९ कोटी झाली आहे.

राज्ये, केंद्रशासित प्रदेशांकडे १४.६८ कोटींहून अधिक लसमात्रा शिल्लक

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने आतापर्यंत मोफत आणि थेट राज्य खरेदी श्रेणीद्वारे ११४ कोटींहून अधिक करोना प्रतिबंधक लसमात्रांचा पुरवठा केला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले. त्यातील १४.६८ कोटींहून अधिक (१४ कोटी, ६८ लाख, ६० हजार १४६) लसमात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याचेही केंद्राने सांगितले.  देशभरात करोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि गती देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करोना लस मोफत पुरवून मदत करत आहे.