करोनाचे १२,८८५ नवे रुग्ण, ४६१ जणांचा मृत्यू

देशातील उपचाराधीन रुग्णांतही सातत्याने घट होत आहे. गेल्या २५३ दिवसांतील सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या बुधवारी नोंदली गेली आहे. १ लाख ४८ हजार ५७९ इतकी रुग्णसंख्या नोंदली गेली असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.४३ टक्के इतकी आहे. ही टक्केवारी मार्च २०२० नंतर इतकी कमी नोंदली गेली आहे. तर करोनामुक्त होण्याची टक्केवारीदेखील ९८.२३ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले आहे.

देशातील रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली असून गेल्या २४ तासांत १२,८८५ रुग्णांची नोंद झाली तर ४६१ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग २७ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही २० हजारांखाली तर सलग १३० दिवसांपासून ५० हजारांखाली नोंदल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

 गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णांमध्ये २,६३० ने घट झाली आहे. 

देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४३ लाख २१ हजार ०२५ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ५९ हजार ६५२ झाली आहे. तर मृत्यू दर १.३४ टक्के नोंदला गेला आहे. केरळमध्ये सर्वाधिक ३६२ तर महाराष्ट्रात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी ३७ लाख १२ हजार ७९४ जण करोनामुक्त झाले आहेत.

दैनंदिन रुग्णवाढीचा दर १.२१ टक्के इतका नोंदला असून गेल्या ३१ दिवसांपासून  रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. साप्ताहिक रुग्णवाढीचा दर १.१७ टक्के नोंदला आहे. सलग ४१ दिवसांपासून साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. भारतात लसीकरण झालेल्यांची संख्या १०७.६३ कोटी झाली आहे.