देशातील रुग्णसंख्येत किंचित घट झाली असून गेल्या २४ तासांत ११,१०६ रुग्णांची नोंद झाली तर ४५९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांत मोठी घट झाली असून ती १ लाख २६ हजार ६२० नोंदली गेली आहे. सलग ४२ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही २० हजारांखाली तर सलग १४५ दिवसांपासून ५० हजारांखाली नोंदल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले आहे.

 उपचाराधीन रुग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.३७ टक्के इतकी आहे. ही टक्केवारी मार्च २०२० नंतर इतकी कमी नोंदली गेली आहे. तर करोनामुक्त होण्याची टक्केवारी देखील ९८.२८ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णांमध्ये २,१४२ ने घट झाली आहे.  देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४४ लाख ८९ हजार ६२३ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ६५ हजार ०८२ झाली आहे. तर मृत्यू दर १.३५ टक्के नोंदला गेला आहे.

आतापर्यंत ३ कोटी ३८ लाख ९७  हजार ९२१ जण करोनामुक्त झाले आहेत. दैनंदिन रुग्णवाढीचा दर ०.९८ टक्के इतका नोंदला असून गेल्या ४६ दिवसांपासून रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. साप्ताहिक रुग्णवाढीचा दर ०.९२ टक्के नोंदला आहे. सलग ५६ दिवसांपासून साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. भारतात लसीकरण झालेल्यांची संख्या ११५.२३ कोटी झाली आहे.