भारतात जलद लसीकरणाची गरज

भारतात  गावांमध्ये लसीकरण केंद्रे उभारण्यात आली असून शहरी भागात निवासी कल्याण संस्थांमार्फत लसीकरण केले  जात आहे.

‘लॅन्सेट’चा नवा अहवाल, धोरणे लवचीक ठेवण्याची शिफारस

भारतात लसीकरण जलद  गतीने  केले आणि त्यासाठीची धोरणे लवचीक ठेवली, तरच तेथील लोकांचे जीव वाचवता येतील, असे ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकाच्या नवीन अहवालात म्हटले आहे.

‘रिस्पॉन्सिव्ह, अँड अगाइल व्हॅक्सिनेशन स्ट्रॅटेजिज अगेन्स्ट कोविड १९ इन इंडिया’ अहवाल लॅन्सेट ग्लोबल हेल्थ यांनी प्रसिद्ध केला असून अहवालात पुढे  म्हटले आहे, की करोनाचा प्रसार असलेली क्षेत्रे निवडून त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. देखरेख व रुग्णांचा शोध महत्त्वाचा असून चाचणी होकारात्मक येण्याआधीच जर पुरेशी काळजी घेतली तर त्याचा उपयोग होऊ शकेल. लसीकरणासाठी कमीत कमी व्यवस्थात्मक यंत्रणा वापरूनही त्याचा मोठा परिणाम साधता येईल. १९१८ व २००९ च्या इन्फ्लुएंझा साथींचा विचार केला तर आताची साथ वेगळी आहे, त्यात संसर्गाच्या लाटा येत आहेत. त्यासाठी लवचीक धोरणे आखून  लसीकरण वेगाने करणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांचे जीव वाचतील व रोजीरोटीही चालेल, कारण कोविड १९ मुळे अनेक ठिकाणी टाळेबंदी करावी लागली आहे.

भारतात  गावांमध्ये लसीकरण केंद्रे उभारण्यात आली असून शहरी भागात निवासी कल्याण संस्थांमार्फत लसीकरण केले  जात आहे. सामाजिक व्यवस्थांचा वापर, पार्किंगच्या जागांचा वापर लसीकरणासाठी केला जात आहे.  फिरत्या लसीकरण सुविधाही  आहेत. त्यामुळे लोकांना आता लसीकरण करून घेणे सोपे होत आहे. मात्र, काही ठिकाणी लसीकरण सहज उपलब्ध नाही.  त्यामुळे वृद्धांना वाहन सुविधा देणे किंवा त्यांना घरी जाऊन लस देणे हे उपाय करता येतील, असे अहवालात नमूद केले आहे.

दिवसभरात ४४ हजार १११ जणांना करोनाची लागण

देशात गेल्या एका दिवसात ४४ हजार १११ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या तीन कोटी पाच लाख दोन हजार ३६२ वर पोहोचली आहे, तर एका दिवसात ७३८ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या चार लाख एक हजार ५० वर पोहोचली आहे, असे शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

देशात जवळपास ९७ दिवसांनंतर उपचाराधीन रुग्णांची संख्या पाच लाखांपेक्षा कमी झाली असून ती चार लाख ९५ हजार ५३३ वर आली आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या १.६२ टक्के इतके आहे. करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के इतके आहे.

देशात आतापर्यंत एकूण ४१ कोटी ६४ लाख १६ हजार ४६३ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

गेल्या २४ तासांत एकूण ७३८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला, त्यापैकी १५६ जण महाराष्ट्रातील आहेत, तर देशात आतापर्यंत चार लाख एक हजार ५० जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी एक लाख २२ हजार ३५३ जण महाराष्ट्रातील आहेत, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection corona positive patient corona vaccination akp

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या