कर्नाटकमध्ये रुग्णसंख्या वाढूनही सप्ताहअखेरची जमावबंदी मागे

मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळ, अधिकारी आणि तज्ज्ञांशी चर्चा करून हे निर्णय घेतले.

(संग्रहित छायाचित्र)

करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असतानाही कर्नाटक सरकारने साप्ताहिक सुटीच्या दिवशी जमावबंदीचा निर्णय मागे घेतला आहे. रात्रीच्या जमावबंदीचा नियम मात्र कायम असणार असल्याचे कर्नाटक सरकारने सांगितले.

मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळ, अधिकारी आणि तज्ज्ञांशी चर्चा करून हे निर्णय घेतले. कर्नाटकमध्ये रात्री १० ते पहाटे पाचपर्यंत जमावबंदीचा आदेश आहे. त्याशिवाय चित्रपटगृहे, पब, क्लब, उपाहारगृहे, बार, हॉटेल या ठिकाणी ५० टक्के उपस्थितीचा नियम करण्यात आला आहे. हे नियम कायम असतील, असे कर्नाटक सरकारकडून सांगण्यात आले.

‘साप्ताहिक सुटीच्या म्हणजेच शनिवार, रविवारी जमावबंदी करण्याची सध्या गरज नाही. करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचा दर केवळ पाच टक्के आहे. हा दर अधिक प्रमाणात वाढला तर साप्ताहिक सुटीच्या दिवशी जमावबंदीचा निर्णय पुन्हा घेण्यात येईल,’ असे महसूलमंत्री आर. अशोका यांनी सांगितले.

देशात दिवसभरात ३,४७,२५४  करोनाबाधित

नवी दिल्ली : देशभरात ३,४७,२५४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने शुक्रवारी दिली. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या तीन कोटी ८५ लाख ६६,०२७ झाली असून त्यांना ९,६९२ रुग्ण ओमायक्रॉनचे आहेत.  सध्या देशभरात उपचाराधीन रुग्णांची संख्या २० लाख १८,८२५ असून गेल्या २३५ दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. करोनामुळे ७०३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद शुक्रवारी करण्यात आली. त्यामुळे एकूण मृत्यूंची संख्या चार लाख ८८,३९६ झाली आहे. एकूण करोनाबाधितांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांची संख्या ५.२३ टक्के आहे. करोनातून बरे होण्याचा दर ९३.५० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. दैनंदिन रुग्णवाढीचा दर १७.९४ टक्के आहे.

असून साप्ताहिक रुग्णवाढीचा दर १६.५६ टक्के आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection corona positive patient karnataka curfew akp

Next Story
भारतविरोधी प्रचार करणाऱ्या ३५ यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी