संसर्ग नियंत्रणासाठी केंद्राची राज्यांना सूचना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात करोना प्रादुर्भाव वाढत असताना गेल्या काही दिवसांमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत चाचण्यांमध्ये घट झाल्याची केंद्राने गंभीर दखल घेतली आहे़ चाचण्यांवर भर देऊन बाधितांवर वेळेत उपचाराद्वारे करोनाप्रसार रोखा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना केली आहे़

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे़ ‘‘करोनाचा उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत़ ओमायक्रॉन विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने २७ डिसेंबर रोजी करोना नियंत्रणाबाबत सुधारित सूचना दिल्या होत्या़ त्यात करोना चाचण्या हा महत्त्वाचा घटक आहे़ मात्र, अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोना चाचण्यांमध्ये घट नोंदविण्यात आली आहे’’, याकडे आहुजा यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे़

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने १० जून रोजी करोना चाचण्यांबाबत मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या होत्या़  करोनाची लागण झाल्याचे सुरुवातीच्या टप्प्यातच समजल्यानंतर रुग्णाचे तात्काळ विलगीकरण आणि उपचार करणे आवश्यक असते़ शिवाय, चाचण्यांमुळे प्रतिबंधित क्षेत्र निश्चितीकरणाबरोबरच रुग्णसंपर्कातील व्यक्तींना शोधून संभाव्य करोनाप्रसार रोखण्यास मदत होते, याचाही आहुजा यांनी या पत्रात पुनरुच्चार केला आहे़

देशात सोमवारी १६़४९ लाख करोना चाचण्या करण्यात आल्या होत्या़ गेल्या २४ तासांत देशात २,३८,०१८ रुग्ण आढळले़ महाराष्ट्राबरोबरच केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात येत आहे़.

देशात बाधितांचे प्रमाण

१५ टक्के

देशात साप्ताहिक करोनाबाधितांचे प्रमाण १५ टक्क्यांच्या आसपास आहे़ सोमवारी हे प्रमाण १४़ ३३ टक्के आढळले होते़ मंगळवारी दिल्लीतील करोनाबाधितांचे प्रमाण २२़ ४७ टक्के होते़

‘स्टेरॉइडचा  वापर टाळा’

करोनाबाधितांवर उपचारासाठी स्टेरॉइडचा वापर टाळावा़. रुग्णाला सातत्याने अति प्रमाणात खोकला असेल तर क्षयरोगाची चाचणी करून घ्यावी, अशी सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने केली आहे़. स्टेरॉइड वापरामुळे काळ्या बुरशीसह अन्य संसर्गाचा धोका वाढत असल्याने त्याच्या वापरावर बंधने आणणे आवश्यक असल्याचे केंद्राने नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे़.

राज्य

३९,२०७ नवे रुग्ण, ५३ जणांचा मृत्यू

राज्यात करोना रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचे दिलासादायक चित्र आहे. दिवसभरात ३९,२०७ नवे रुग्ण आढळले, तर ५३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत  पनवेल ११२३, नाशिक शहर १५८५, अहमदनगर ८२९, पुणे शहर ६३९८, उर्वरित पुणे जिल्हा २२१९, पिपंरी-चिंचवड २९६२, नागपूर महापालिका १९३४ अशी नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात दिवसभरात ३८,४२४ रुग्ण करोनामुक्त झाले असून, उपचाराधीन रुग्णांची सख्या २,६७,६५९ आहे.

मुंबई

१२,८१० रुग्ण करोनामुक्त 

मुंबईत मंगळवारी ६,१४९ नवे रुग्ण आढळले आहेत तर सात जणांचा मृत्यू झाला. करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मंगळवारी एका दिवसांत १२,८१० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  शहरात गेल्या काही दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्या थोडी वर खाली होत असली तरी संसर्ग वाढीचा वेग कमी झाला आहे. मंगळवारी नव्याने आढळलेल्या ६ हजार १४९ रुग्णांपैकी ५७५ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे, तर यातील ९५ जणांना प्राणवायू लावावा लागला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या घटल्यामुळे उपचाराधीन रुग्णसंख्या ही कमी होऊन ४४ हजारांवर आली आहे. रुग्णालयात ५,२६५ रुग्ण दाखल असून सुमारे ३८ हजार खाटा रिक्त आहेत.  मंगळवारी शहरात मृत्यू झालेल्या सात रुग्णांपैकी पाच रुग्ण ६० वर्षावरील होते. मृतांपैकी  सहा रुग्णांना दीर्घकालीन आजार होते.

ठाणे

जिल्ह्यात ३,८९५ नवे बाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ३,८९५ करोना रुग्ण आढळून आले. तर सहा जणांचा मृत्यू झाला.  ठाणे शहरात १,१५२, नवी मुंबई १,१५५, कल्याण-डोंबिवली ५३७, रा- भाईंदर ४५६, ठाणे ग्रामीण २४०, उल्हासनगर १६३, अंबरनाथ ९७, बदलापूर ७२ आणि भिवंडीमध्ये २३ करोना रुग्ण आढळून आले, तर सहा मृतांपैकी कल्याण-डोंबिवली तीन, ठाणे, मीरा-भाईंदर आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection corona test corona positive patient central government instructions akp
First published on: 19-01-2022 at 01:07 IST