केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : करोना रुग्णांची मृत्यूसंख्या कमी नोंदविण्यास केंद्राने सांगितलेले नाही, राज्यांकडून मृत्यूची आकडेवारी दिले जाते, ती फक्त एकत्र करण्याचे काम केंद्र करते, असे स्पष्ट करत करोनाचे मृत्यू लपवल्याचा आरोप केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी फेटाळला. राज्यसभेत मंगळवारी करोनाच्या समस्येवर झालेल्या चर्चेला मंडाविया यांनी उत्तर दिले.

‘पेगॅसस’ प्रकरणाप्रमाणे करोनाच्या मुद्द्यावरूनही विरोधक आणि केंद्र सरकार यांच्यात वादंग माजला. विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज तहकूब होऊ लागल्यामुळे अखेर राज्यसभेचे सभापती व्यकंय्या नायडू यांनी हस्तक्षेप करत विरोधकांची समजूत काढली. त्यानंतर दोन वाजता करोनावर वरिष्ठ सभागृहात चर्चा करण्यात आली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, ‘सरकारी आकडेवारीपेक्षा मृत्यूची संख्या अधिक असल्याचे सांगितले जाते. केंद्र मृत्यूचा खरा आकडा का देत नाही’, असा सवाल उपस्थित केला होता.

राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या हाताळणीवरून केंद्राला लक्ष्य बनवले. नोटबंदीप्रमाणे टाळेबंदीही लोकांवर अचानक लादली गेली. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत प्रचारात लोकांची गर्दी जमवून केंद्र सरकारने प्रथम करोना नियमांचा भंग केल्याचा आरोपही खरगे यांनी केला. त्यावर मंडाविया म्हणाले की, राज्य सरकारे आणि जनतेने सामूहिक निर्णय घेतला तर तिसरी लाट आपण टाळू शकतो. लोकांचा निश्चय आणि पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन आपल्याला तिसऱ्या लाटेपासून वाचवू शकेल, असेही मंडाविया म्हणाले.

करोनाच्या मुद्द्यावरून केंद्राने राजकारण केलेले नाही. राज्ये व केंद्र यांना एकत्रित काम करावे लागते. करोनासंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी राज्यांना करावी लागते पण, राज्य फोल ठरल्याचा आरोप केंद्राने कधीही केलेला नाही. लसीकरणाच्या तुटवड्यावर सातत्याने केंद्रावर आगपाखड केली जाते पण, अनेक राज्यांकडे १० ते १५ लाख लसमात्रांचा साठा आहे, असा दावाही मंडाविया यांनी केला. टाळ्या आणि थाळी वाजवण्याचे मंडाविया यांनी समर्थन केले. करोनायोद्ध्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, लोकांच्या संरक्षणासाठी उभ्या असलेल्या पोलिसांचा सन्मान करण्यासाठी थाळी वाजवल्या गेल्या. माझी वैद्यकीय शाखेत शिकणारी मुलगी कोव्हिड कक्षात काम करत होती, असेही मंडाविया म्हणाले.

पंतप्रधान मोदी करोना आपत्तीसंदर्भात संसदेच्या सदस्यांसमोर मंगळवारी भाषण करणार असल्याचे सोमवारी केंद्र सरकारने सांगितले होते. मात्र त्याला काँग्रेस, अकाली दलाने कडाडून विरोध केला. संसदेचे अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांनी संसदेबाहेर बोलणे अपेक्षित नाही. त्यांनी संसदेच्या सभागृहात स्पष्टीकरण द्यावे अशी भूमिका घेत या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. शेती कायदे रद्द करण्याला केंद्राने प्राधान्य दिले पाहिजे अशी भूमिका अकाली दलाने घेतली. देशातील करोनाच्या परिस्थितीवर मोदींच्या उपस्थिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण सादरीकरण करणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले होते.

टाळ्या-थाळ्यांचे समर्थन
टाळ्या आणि थाळी वाजवण्याचे मंडाविया यांनी समर्थन केले. करोना योद्ध्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, लोकांच्या संरक्षणासाठी उभ्या असलेल्या पोलिसांचा सन्मान करण्यासाठी थाळी वाजवल्या गेल्या. माझी वैद्यकीय शाखेत शिकणारी मुलगी कोव्हिड कक्षात काम करत होती, असेही मंडाविया म्हणाले.

भाजपच्या खासदारांना मोदींचा आदेश
करोना प्रतिबंधक लशींच्या तुटवड्याचा आरोप करून काँग्रेस देशभर नकारात्मक वातावरण तयार करत असून त्यांचे मनसुबे मोडून काढा. काँग्रेसचा लस तुटवड्याचा आरोप खोडून काढा. लोकांपर्यंत केंद्र सरकारचे काम पोहोचवा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत केली. हे केले नाही तर ही पोकळी विरोधक खोटेपणाने भरून काढतील, असा इशाराही त्यांनी पक्षाच्या खासदारांना दिला.
लसमात्रांचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण केंद्रे बंद होऊ लागल्याची तक्रार राज्य सरकारांकडून केली जात आहे पण, केंद्र सरकारने लशींच्या तुटवड्याचा आरोप फेटाळून लावला आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी सातत्याने केंद्राला लक्ष्य बनवले आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी भाजपच्या खासदारांना करोनाच्या प्रश्नावरून लोकांमध्ये पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडण्याचा सल्ला दिला.