लशींना बाजारातील नियमित वापरास मंजुरी; औषध नियामकांची सशर्त परवानगी

नव्या औषधे व नैदानिक चाचण्या नियम २०१९ अन्वये ही मंजुरी देण्यात आली आहे.

Omicron new coronavirus variant deltacron emerges in Cyprus
(प्रातिनिधिक छायाचित्र)

औषध नियामकांची सशर्त परवानगी

कोव्हॅक्सिन व कोव्हिशील्ड या करोना प्रतिबंधक लशींचा काही अटींवर प्रौढांसाठी नियमित बाजारात वापर करण्यास भारताच्या औषध नियामकांनी परवानगी दिली असल्याची माहिती आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी दिली.

सर्वाना करोना प्रतिबंधक लशीची पहिली व दुसरी मात्रा, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्धक मात्रा उपलब्ध करून देण्यासाठी असलेली सरकारची लसीकरण मोहीम यापुढेही सुरू राहील, असेही मांडविया म्हणाले.

‘कोव्हॅक्सिन व कोव्हिशील्ड या लशींना सध्या आपत्कालीन वापरासाठी असलेल्या मर्यादित परवानगीचा दर्जा वाढवून त्यांच्या काही अटींच्या अधीन राहून प्रौढ लोकसंख्येसाठी सामान्य वापर करण्याची परवानगी नियामकांनी दिली आहे,’ असे त्यांनी सांगितले.

यापुढे या दोन लशी खासगी रुग्णालयांमध्ये आधीच निर्धारित केलेल्या कमाल किरकोळ किमतीत उपलब्ध असतील आणि लोक त्या तेथून खरेदी करू शकतील, असे उच्चपदस्थ सूत्रांनी या मंजुरीनंतर लगेचच सांगितले. हळूहळू, या लशी पूर्वी खासगी रुग्णालयांत ज्या किमतीला विकल्या जात होत्या त्यापेक्षा कमी किमतीत बाजारात उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.

यामागची कल्पना अशी आहे की, जे लोक वर्धक मात्रा घेण्यास इच्छुक आहेत ते आता त्या खासगी रुग्णालयांमार्फत घेऊ शकतात, कारण खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या लशी एखाद्याच्या इच्छेनुसार पहिली मात्रा, दुसरी मात्रा किंवा वर्धक मात्रा यापैकी कुठल्याही कारणासाठी घेतल्या जाऊ शकतील, असे एका सूत्राने सांगितले.

नव्या औषधे व नैदानिक चाचण्या नियम २०१९ अन्वये ही मंजुरी देण्यात आली आहे.

घालण्यात आलेल्या अटींनुसार, कंपन्या त्यांच्या सध्या सुरू असलेल्या नैदानिक चाचण्या व पुरवणार असलेल्या लशी यांची आकडेवारी सादर करतील, तसेच देशात कोविन प्लॅटफॉर्मवर केल्या जाणाऱ्या संपूर्ण लशीकरणाची नोंद करतील. या अटींचा भाग म्हणून, लसीकरणामुळे होणाऱ्या प्रतिकूल परिणामांवर देखरेखही कायम ठेवली जाणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection corona vaccine approval for regular use in the market akp

Next Story
करोना रुग्णसंख्या स्थिर, मात्र लक्ष देण्याची गरज
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी