जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेचा मुद्दा

भारत बायोटेकच्या करोनावरील कोव्हॅक्सिन लशीचा आपत्कालीन वापर यादीत समावेश करण्याबाबतचा निर्णय जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) येत्या चार ते सहा आठवडय़ांमध्ये घेण्याची शक्यता आहे, असे डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे.

सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एनव्हायर्नमेण्टने (सीएसई) आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या. भारत बायोटेक ही कोव्हॅक्सिनची उत्पादक कंपनी संपूर्ण माहिती डब्ल्यूएचओच्या पोर्टलवर अपलोड करीत असल्याने डब्ल्यूएचओ कोव्हॅक्सिनचा आढावा घेत आहे, असे स्वामिनाथन म्हणाल्या.

कोव्हॅक्सिनची सुरक्षितता आणि परिणामकारकता यासह उत्पादनाच्या दर्जाबाबतची संपूर्ण माहिती भारत बायोटेकने उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन वापर यादीत समावेश करण्याबाबतचा निर्णय चार-सहा आठवडय़ांमध्ये घेण्यात येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे, असेही त्या म्हणाल्या.

भारतात मृत्यूसंख्येत वाढ

भारतात गेल्या एका दिवसात ४२ हजार ७६६ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या तीन कोटी सात लाख ९५ हजार ७१६ वर पोहोचली आहे, तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती चार लाख ५५ हजार ३३ वर पोहोचली आहे, असे शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. गेल्या २४ तासांत करोनामुळे १२०६ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या चार लाख सात हजार १४५ वर पोहोचली आहे. दिवसभरातील मृत्यूंची नोंद गुरुवारी ८१२, तर  शुक्रवारी ९११ इतकी झाली होती.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण बाधितांच्या १.४८ टक्के आहे, तर  बरे होण्याचे प्रमाण ९७.२० टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात शुक्रवारी १९ लाख ५५ हजार २२५ चाचण्या करण्यात आल्या, त्यामुळे आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या ४२ कोटी ९० लाख ४१ हजार ९७० वर पोहोचली आहे. करोनातून आतापर्यंत दोन कोटी ९९ लाख ३३ हजार ५३८ जण बरे झाले आहेत तर मृत्युदर १.३२ टक्के इतका आहे. आतापर्यंत ३७.२१ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या एका दिवसात करोनामुळे १२०६ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी ७३८ जण महाराष्ट्रातील आहेत.  आतापर्यंत एकूण चार लाख सात हजार १४५ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी एक लाख २५ हजार ३४ जण महाराष्ट्रातील आहेत.

करोना लशींच्या १.७३ कोटी मात्रा राज्यांकडे शिल्लक

नवी दिल्ली : शिल्लक असलेल्या आणि वापरल्या न गेलेल्या मिळून करोना प्रतिबंधक लशींच्या १.७३ कोटींहून अधिक मात्रा अद्याप राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे उपलब्ध असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले.

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सर्व माध्यमांतून करोना लशींच्या ३८.५४ कोटींहून अधिक मात्रा पुरवण्यात आल्या आहेत आणि वाया गेलेल्या लशी जमेला धरून ३६,८०,६८,१२४ मात्रा वापरण्यात आल्या आहेत.

१.७३ कोटींहून अधिक (१,७३,३३,०२६) शिल्लक आणि वापरल्या न गेलेल्या करोना लशींच्या मात्रा अद्यापही राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत, असेही मंत्रालयाने सांगितले.

‘डेल्टा’मुळे जूनमध्ये रशियात अधिक बळी

मॉस्को : रशियाच्या करोना कृती दलाच्या मते यावर्षी जूनमध्ये  बळी गेलेल्या करोनारुग्णांची संख्या डेल्टा विषाणूमुळे १४  टक्क्यांनी वाढली आहे. पपंतप्रधान तात्याना गोलिकोवा यांनी सांगितले, की सध्या आमच्या हाती जूनमधील जी माहिती हाती आली आहे त्याचा विचार करता डेल्टा विषाणूने १३.९ टक्के बळी गेले आहेत. रशिया करोना साथीशी जूनपासून लढत असून उन्हाळ्यात ९ हजार रुग्ण होते, ते आता २३ हजार झाले आहेत. शुक्रवारी कृती दलाने २५७६६ नवीन संसर्गांची नोंद केली असून साथीनंतर प्रथमच दैनंदिन मृत्यू दर हा ७०० च्या पुढे गेला आहे.

स्पेनमध्ये रुग्णसंख्येत वाढ

बार्सेलोना : स्पेनमध्ये अलीकडेच करोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून जुलैच्या मध्यावर पुन्हा एकदा ही साथ वाढू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. चिलीमध्येही साथ मोठय़ा प्रमाणात वाढत असून अनेक  रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.  करोनाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा अतिदक्षता विभागातील खाटा भरू लागल्या असून आरोग्य केंद्रे व आपत्कालीन विभागात लोकांची गर्दी वाढू लागली आहे. प्राणवायू निर्मितीची सोय अनेक देशात असली तरी प्राणवायू देण्याची वेळ यावी यातूनच आता गांभीर्य वाढत असल्याचे दिसून येत आहे.

 

मागील काळात जशी रुग्णांची संख्या वाढून वैद्यकीय व्यवस्थेवर ताण आला होता तसाच आता येत असून मधल्या काळात केवळ दोन आठवडय़ात ८ रुग्ण होते तेथे आता ३५ रुग्ण येत आहेत. रुग्णांची वाढती संख्या हा धोक्याचा इशारा असून अनेक लोकांमध्ये कुठलीही लक्षणे दिसलेली नाहीत, असे कोविड केंद्राचे प्रमुख जुआन पाब्लो हारकाजॅडा यांनी सांगितले. मार्च २०२० मध्ये जशी लाट आली होती त्याच्याशी आताच्या परिस्थितीची तुलना करता येईल. अनेक लोकांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे, पण सर्वांनाच प्राणवायूची गरज लागत आहे असे नाही. कार्टिकोस्टेरॉइडसने ते बरे होत आहेत. विशी व तिशीतील डॉक्टरांना न्यूमोनिया होत असल्याचे दिसून येत आहे.