कोणत्याही देशातून भारतात येणाऱ्या ज्या प्रवाशांची करोना चाचणी होकारात्मक येईल, त्यांना शनिवारपासून विलगीकरण केंद्रात राहणे अनिवार्य राहणार नसून, नव्या निकषांनुसार त्यांना गृह विलगीकरणात राहावे लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विदेशातील ज्या प्रवाशांची चाचणी होकारात्मक आली असेल, त्यांची भारतातील चाचणी नकारात्मक आली, तरी त्यांना सात दिवसांसाठी गृह विलगीकरणात राहावे लागेल आणि भारतात आल्यापासून आठव्या दिवशी आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी लागेल, असे गुरुवारी जारी करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. या सुधारित सूचना शनिवारपासून अमलात आल्या आहेत. यापूर्वीच्या निकषांनुसार, कुठल्याही देशातून येणाऱ्या प्रवाशांची सोय विलगीकरण केंद्रात केली जात होती आणि त्यांच्यावर आदर्श नियमावलीनुसार उपचार करण्यात येत होते, असे सरकारने सांगितले. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, अनिवार्यपणे ‘विलगीकरण केंद्रात’ राहण्याची अट काढून टाकण्यात आली आहे.
याहीउपर, तपासणीत ज्या प्रवाशांमध्ये करोनाची लक्षणे आढळतील त्यांना तत्काळ विलग करण्यात येऊन उपचार केंद्रात पाठवले जाईल. त्यांची चाचणी होकारात्मक आल्यास त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे.