भारतातही सध्यातरी  करोना लशीच्या वर्धक मात्रेची गरज नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. प्रतिकारशक्ती तज्ज्ञ सत्यजित रथ यांनी म्हटले आहे, की आतापर्यंत भारतातील केवळ पंधरा टक्के लोकांना लशीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.  म्हणजेच ज्या लोकांना संसर्गाचा धोका आहे, अशांपैकी फार कमी लोकांना लशीच्या दोन्ही मात्रा मिळालेल्या आहेत. त्यामुळे नैतिकदृष्ट्या विचार केला तर लोकांना आताच वर्धक मात्रा देणे योग्य ठरणार नाही. संसर्गाची शक्यता आणखी किती लोकांना आहे हे माहिती नसताना अशा प्रकारे वर्धक मात्रा देणे  योग्य ठरणार नाही. काही व्यक्तींना सहआजार आहेत व त्यांच्यात करोनाचा धोका असला तरी दोन लसमात्रा घेतल्यानंतर त्यांना तो धोका राहणार नाही.

भारतात तिसऱ्या मात्रेची घोषणा करण्यात आली नसली तरी मुंबईतील काही राजकीय नेते आणि आरोग्य कर्मचारी यांनी तिसरी वर्धक मात्रा घेतली आहे.

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले, की वर्धक मात्रा हा सध्याचा विषय नाही, तर लोकांना आधी दोन मात्रा देणे महत्त्वाचे आहे.

सध्याच्या अवस्थेत भारताने वर्धक मात्रा देण्याचा विचार करू नये, कारण लशीसाठी पात्र असलेल्यांपैकी ४० टक्के लोकांना अजून  पहिली मात्राही मिळालेली नाही. ज्या लोकांना काही सहआजार असतील त्यांची परिस्थिती बघून त्यांच्याबाबत तिसऱ्या मात्रेचा निर्णय घ्यावा.  वर्धक मात्रा दिली तरी त्याचा फायदा विषाणूच्या काही प्रकारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी होतोच असे नाही,  वर्धक मात्रेचा उपयोग हा मर्यादित आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढेलच याची खात्री नाही. -विनिता बाळ, प्रतिकारशक्ती तज्ज्ञ