भारताला करोना मदतीसाठी अमेरिकेत ठराव मंजूर

द्विपक्षीय ठराव काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शेरमन व स्टीव्ह शॅबोट यांनी तयार केला असून त्याला ४१ सह पुरस्कर्ते लाभले.

corona
प्रातिनिधिक छायाचित्र

अमेरिकी प्रतिनिधीगृहाने भारताला करोना विरोधात लढा देण्यासाठी मदत करण्यासाठीचा ठराव मंजूर केला आहे. भारताला बायडेन प्रशासनाकडून सुलभपणे मदत मिळावी यासाठी हा ठराव करण्यात आला.

द्विपक्षीय ठराव काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शेरमन व स्टीव्ह शॅबोट यांनी तयार केला असून त्याला ४१ सह पुरस्कर्ते लाभले. जेव्हा अमेरिकेत करोनाची साथ जोरात होती तेव्हा भारताने अनेक औषधांवरची बंदी उठवून अमेरिकेला पुरवठा केला होता त्याची परतफेड करण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतीय दबाव गटाचे सदस्य असलेले शेरमन व शॅबोट यांनी ४१ जणांच्या पाठिंब्याने हा ठराव मांडला त्यात ३२ डेमोक्रॅटिक सदस्य होते तर नऊ रिपब्लिकन सदस्य होते.

ठरावात म्हटले आहे की, भारताचा औषध उद्योग हा करोना साथीत महत्त्वाची भूमिका पार पाडीत असून आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका यांना त्याचा लाभ होत आहे. भारत हा लशींचा मोठा उत्पादक देश असून त्यांनी एकूण ९३ देशांना ६६.३६ दशलक्ष मात्रा निर्यात केल्या होत्या. जगातील लस उत्पादनाच्या निम्मे उत्पादन भारतात होते. अमेरिका भारताच्या पाठीशी असून सामूहिक पद्धतीने काम करून आम्ही विषाणूवर मात करू.

शॅबोट यांनी सांगितले की, करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संकट काळात भारतानेच अमेरिकेला वैद्यकीय मदत केली होती. भारतात आता दुसरी लाट आली असून त्यातील रुग्णही कमी होत आहेत पण तरी यात भारताला अमेरिकेने मदत केली पाहिजे.

अमेरिकी काँग्रेसच्या दीडशेहून अधिक सदस्यांनी भारताला पाठिंब्यासाठी संदेश, निवेदने, पत्रे, ट्वीट यांचा वापर केला. अलीकडेच भारतीय राजदूत तरणजित सिंग संधू यांनी अमेरिकी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona virus infection us approves resolution to help india akp