करोनाचा कहर हा देशभरात आणि जगभरात वाढतो आहे. अशात या व्हायरसचा परिणाम नात्यांवरही होऊ लागला आहे. करोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी देशात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. अशात एक तरुण मुंबईतील नागपाडा भागात काम करत होता. तो लॉकडाउनमुळे वाराणसीला जाण्यास निघाला. १६०० किमी चालत जाण्याची तयारी त्याने ठेवली होती. १४ दिवसांपूर्वीच तो त्याच्या सहा मित्रांसोबत निघाला. खिशात थोडे पैसे घेऊन रस्त्यावरुन आणि रेल्वे ट्रॅकरुन चालत तो अखेर वाराणसीला पोहचला. तिथे पोहचल्यावर आपण आल्याचे त्याने आईला फोन करुन सांगितले. मात्र त्याच्या आईने दरवाजा उघडलाच नाही. तसंच त्याच्या भावाने आणि वहिनीनेही घराचा दरवाजा उघडला नाही.

खरंतर या तरुणाने स्वतःची तपासणी केली होती. त्याला १४ दिवस क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र तो चालत वाराणसीला गेला. आता या तरुणाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती आता चांगली आहे मात्र त्याला प्रचंड थकवा जाणवतो आहे. लाइव्ह हिंदुस्थानने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. १४ दिवसांपूर्वी आपल्या आईला आणि घरातल्यांना भेटण्यासाठी हा तरुण मुंबईहून पायी वाराणसीला जाण्यासाठी निघाला. आपला मुलगा त्याच्या मित्रांसह मुंबईहून इथे आला आहे हे समजलं मात्र त्याच्या आईने त्याला घराचा दरवाजाच उघडला नाही. घरातल्यांनी आजूबाजूच्या लोकांनाही मुलगा त्याच्या मित्रांसह मुंबईतून आल्याचं सांगितलं. त्यानंतर या तरुणाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या तरुणाला किंवा त्याच्यासोब आलेल्या तरुणांना करोनाची लागण झाली असेल असं गावकऱ्यांना वाटतं आहे. आम्ही या तरुणाला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेलो तिथे या तरुणाची तपासणी केली. त्यानंतर आम्ही त्याला त्याच्या घरी घेऊन गेलो मात्र घरातल्यांनी त्याला घरात घेण्यास नकार दिला. अशी माहिती कोतवाली ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पांडेय यांनी दिली. सध्या त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या तरुणात करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. जर त्याला त्याच्या घरातल्यांनी घरात घेतलं नाही तर त्याची सोय सुरक्षित ठिकाणी केली जाईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- धक्कादायक… लॉकडाउनदरम्यान जेवण मिळत नाही म्हणून पाच मुलांना गंगेत फेकलं

मुंबईत काम करुन जे पैसे मिळत ते हा तरुण गावी पाठवत असे. आईसाठी आणि वहिनीसाठी त्याने अनेकदा पैसे पाठवले आहेत. जेव्हा तो चालत घराकडे यायला निघाला तेव्हा अनेकदा तो उपाशी राहिला. पण त्याने पैसे घरी द्यायचे म्हणून खर्च केले नव्हते. पोलिसांनी या तरुणाच्या इतर मित्रांचीही माहिती मिळवली आहे. या सगळ्यांचीही वैद्यकीय तपासणी केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.