२४ तासांत चार लाख

करोनामुळे गेल्या एका दिवसात ३,५२३ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ८२८ रुग्णांचा समावेश आहे.

रुग्णसंख्या दोन कोटींनजीक, देशात एका दिवसात ३,५२३ करोना रुग्णांचा मृत्यू

देशातील दैनंदिन करोना रुग्णसंख्या शनिवारी सर्वाधिक, चार लाख एक हजार ९९३ नोंदली गेली, तर गेल्या २४ तासांत ३,५२३ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने बळींची एकूण संख्या दोन लाख ११ हजार ८५३ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या एक कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ वर पोहोचली असून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने ३२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ती ३२ लाख ६८ हजार ७१० झाली आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या १७.०६ टक्के इतके आहे. बरे होण्याचे प्रमाण आणखी कमी होऊन ते ८१.८४ टक्के झाले आहे. आतापर्यंत एक कोटी ५६ लाख ८४ हजार ४०६ जण बरे झाले असून मृत्युदर १.११ टक्क्यांवर पोहोचला आहे.

करोनामुळे गेल्या एका दिवसात ३,५२३ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ८२८ रुग्णांचा समावेश आहे. देशातील बळींचा आकडा दोन लाख ११ हजार ८५३ झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ६८,८१३ जणांचा समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

दिल्लीत टाळेबंदीत वाढ

राजधानी दिल्लीत दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून शनिवारी तेथे २५ हजारांहून अधिक रुग्ण आढळले. त्यामुळे दिल्लीतील टाळेबंदी आठवडाभर वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे जाहीर केला. दिल्लीत रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३० टक्के आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona virus positive patient akp