देशातील करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. मात्र, करोनाचा संसर्ग वाढला असल्याचं मागील नऊ दिवसातील आकडेवारीवरून समोर आलं आहे. देशात ४५ दिवसांमध्ये शंभर रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर फक्त नऊ दिवसांतच ४०० जणांना करोनाची लागण झाली आहे.

सध्या देशातील करोनाग्रस्तांचा आकडा ५१९ वर पोहोचला आहे. करोनामुळे देशात आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात करोनामुळे लॉकडाउन (कर्फ्यू) लागू करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांतील रुग्णांची संख्या वाढल्यानं केंद्र सरकानं तातडीनं हा निर्णय घेतला आहे. देशात १५ मार्चपर्यंत ११० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं. बुधवारी हा आकडा ५१९ वर गेला आहे. यातील ३९ जण बरे झाले आहेत. तर दिल्लीत आणखी एकाचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या दहावर पोहोचली आहे.

करोनाच्या वाढीचा वेग किती?

भारतात सर्वात आधी केरळमध्ये करोनाचा रुग्ण आढळून आला होता. तशी नोंद आहे. ३० जानेवारी रोजी केरळमध्ये देशातील पहिल्या करोना बाधित रुग्णाची नोंद झाली. त्यानंतर १५ मार्चपर्यंत देशातील करोना बाधितांची संख्या शंभरवर पोहोचली. यात अगदी झोप उडवणारी बाब म्हणजे १५ मार्च ते २४ मार्च या नऊ दिवसांच्या कालालधीत तब्बल ४०० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं आकडेवारीतून दिसून आलं आहे. १०० रुग्णांना लागण होण्यासाठी तब्बल ४५ दिवस लागले. मात्र, त्यानंतर नऊ दिवसांत ४०० जणांना करोनाची लागण झाली आहे. आता एकूण आकडा ५१९वर पोहोचला आहे. त्यामुळे सरकारनं करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी अत्यावश्यक सोयीसुविधा उभारण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.

आटोक्यात आणण्यासाठी सरकारने घेतले महत्त्वाचे निर्णय –

लॉकडाउनच्या काळात जे परदेशातून आलेले आहेत. त्यांना होम क्वारंटाइन ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकारनं राज्यांना दिल्या आहेत. व्हेटिंलेटर आणि वैयक्तिक सुरक्षेसाठी लागणाऱ्या साहित्याची तातडीनं खरेदी करावी, असं केंद्रानं राज्यांना सांगितलं आहे.
करोनामुळे अचानक उद्भवलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्व राज्यांनी रुग्णालये, क्लिनिकल लॅब, विलगीकरण वार्ड, सध्या असलेल्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि इतर अतिरिक्त वैद्यकीय सुविधांसाठी वित्तीय साधनं तातडीनं नियुक्त करावी. या सुविधांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणं, मास्क आणि मुबलक प्रमाणात औषधी आदी आवश्यक आहे, असं केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीब गौबा यांनी राज्यांच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. यात करोना बाधितासाठी पूर्ण सुरक्षा असलेलं रुग्णालय आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची माहिती केंद्राच्या पोर्टलवर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.