Coronavirus : देशभरात चोवीस तासांत 3 हजार 277 नवे रुग्ण,127 मृत्यू

करोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या आता 62 हजार 939  वर पोहचली

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे.  मागील चोवीस तासांत देशभरात 3 हजार 277 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 127 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 62 हजार 939  वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 41 हजार 472 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 19 हजार 358 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 2 हजार 109 जणांचा समावेश आहे.

करोनातून बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे अधिक शिथिल करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी घेतला. त्यानुसार, अतिसौम्य-सौम्य व मध्यम तीव्रतेच्या रुग्णांमध्ये सलग तीन दिवस ताप नसेल तर नमुना चाचणी न करताही त्यांना घरी पाठवता येईल. फक्त गंभीर रुग्णांना सोडण्यापूर्वी नमुना चाचणी तसेच अन्य वैद्यकीय चाचणी करावी लागणार आहे.

करोनाच्या महासाथीमुळे अनेक विकसित देशांना भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागले. भारतात अतिवाईट स्थिती उद्भवण्याची शक्यता कमी असली तरी कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज असल्याचे मत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शनिवारी व्यक्त केले. गेले आठवडाभर हर्षवर्धन यांनी प्रत्येक राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी तसेच आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला आहे.

करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पुन्हा वाढला असून तो १२ दिवसांवरून आता १० दिवसांवर आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये केंद्राची पथके सातत्याने पाहणी करत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी शुक्रवारी दिली.

टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. त्याअंतर्गत मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू, पर्यटक आदींना गावी पोहोचवण्यासाठी बस व रेल्वेंना अनुमती देण्यात आलेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus 3 thousand 277 new patients 127 deaths in 24 hours across the country msr

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या