जेईई आणि नीट परीक्षा घेण्यासाठी आमच्यावर दबाव होता, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा दावा

८० टक्के उमेदवारांनी अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड केल्याची शिक्षणमंत्र्यांची माहिती

संग्रहित (PTI)

राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG) घेण्यावरुन सध्या केंद्र सरकारवर टीका होत आहे. परीक्षा ठरल्या वेळेतच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सतत विद्यार्थी आणि पालकांकडून दबाव असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

जेईई परीक्षा देणाऱ्या ८० टक्के उमेदवारांनी अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड केले असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे. “जेईई आणि नीट परीक्षेसाठी परवानगी का देत नाही यासाठी आम्ही सतत पालक आणि विद्यार्थ्यांच्या दबावात होतो. विद्यार्थ्यांना काळजी लागली होती. आपण अजून किती काळ अभ्यास करायचा ही चिंता त्यांना सतावत होती,” असं त्यांनी सांगितलं आहे.

“जेईई परीक्षेसाठी साडे आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामधील सात लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड केलं आहे. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. शिक्षण नाही तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे,” असं रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं आहे,

शाळा सुरु करण्यासंबंधी विचारण्यात आलं असताना गृह तसंच आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या गाइडलाइन्सच्या आधारे हा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे. दरम्यान जेईई आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कऱण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना मास्क, ग्लोव्ह्ज, पाण्याची बाटली आणि सॅनिटायजर सोबत ठेवणं अनिवार्य असणार आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. जर एखाद्याचं शरीराचं तापमान जास्त असेल तर त्यांच्यासाठी विलगीकरण कक्ष ठेवण्यात आला आहे. मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आपण संकटात टाकत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. स्वीडनची १७ वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गनेही ट्विट करत हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus education minister ramesh pokhriyal nishank on neet jee exam sgy

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या