इटलीमध्ये करोनामने थैमान घातलं असून मागील अनेक पिढ्यांनी पाहिली नाही अशी भयंकर स्थिती सध्या इटलीत निर्माण झाली आहे. अवघी सहा कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये करोनामुळे जगभरातील सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. १९ मार्चलाच इटलीमधील मृतांचा आकडा हा चीनपेक्षाही अधिक झाला. त्यानंतर एक वृत्तसमोर आले की इटलीमध्ये ८० पेक्षा अधिक वयोमान असणाऱ्या करोनाच्या रुग्णांवर डॉक्टर उपचार करत नाहीयत. इटलीमधील आरोग्य व्यवस्था आणि इतर सामुग्री ही करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी कमी पडत असल्याने जे रुग्ण बचावण्याची शक्यता कमी आहे अशा रुग्णांवर उपचार केले जात नसल्याची बातमी समोर आली. मात्र ही बातमी किती खरी आहे? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

करोनाग्रस्त वयस्कर रुग्णांवर उपचार करायचे नाहीत अशा बातम्या समोर येण्यामागील मुख्य कारण ठरलं ते म्हणजे द टेलिग्राफ या वृत्तपत्रामध्ये छापलेला एक अहवाल आणि त्यासाठी देण्यात आलेला कागदोपत्री पुरावा. टेलिग्राफमधील लेखामध्ये इटलीतील ट्युरीन शहरामधील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पत्राचा हवाला देत वृद्ध व्यक्तींवर उपचार केले जात नसल्याचा दावा करण्यात आला होता. ट्युरीन शहर हे इटलीमध्ये करोनाचा फटका बसलेल्या महत्वाच्या शहरांपैकी एक आहे. टेलिग्राफने ज्या पत्रकाचा हवाला दिला होता त्यामध्ये जर एकाच वेळी सर्व रुग्णांना आयसीयुची सुविधा देता आली नाही तर काय करावे यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे छापण्यात आली होती. जर आरोग्य यंत्रणेवर ताण पडेल इतकी रुग्णांची संख्या वाढल्यास उपचार देताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याबद्दल या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं होतं. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार उपचार देताना ज्या गोष्टींचा विचार केला जाणार होता त्यामध्ये रुग्णाचे वय ८० हून कमी असणे आणि त्याच्या वैद्यकीय इतिहासाला म्हणजेच त्या रुग्णाला कोणकोणते आजार आहेत आणि तो जगण्याची शक्यता किती आहे याच्या आधारावर उपचार देण्याचे निर्देश देण्यात आले होते.

ईशान्य इटलीमधील पीडमॉन्ट प्रदेशातील आरोग्य अधिकारी असणाऱ्या लुंगी कार्डी यांनी टेलिग्राफशी संवाद साधताना देशातील आऱोग्य यंत्रणेवर ताण पडेल इतका करोना पसरु नये अशीच आमची इच्छा असल्याचे मत व्यक्त केलं होतं. “मात्र जे पत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलं आहे त्या पत्रकातील मार्गदर्शक तत्वे आप्तकालीन प्रसंगी पाळली जावीत यासाठीच आहेत. म्हणजेच रुग्णालयामध्ये रुग्णांच्या संख्येइतके वॉर्ड किंवा आयसीयु नसतील तर कोणत्यातरी गोष्टीच्या आधारे कोणाला प्राधान्य द्यायचे हे ठरवावेच लागते. त्यासाठीच ती मार्गदर्शक तत्वे होती,” असंही कार्डी म्हणाले.

फोटोगॅलरी >> करोनाने इटलीत का घेतले इतके बळी?; जाणून घ्या २० महत्वाच्या गोष्टी

त्यामुळेच इटलीने करोनाग्रस्त वयस्कर रुग्णांवर उपचारच केले नाहीत हा दावा चुकीचा आहे. खरं तर हे आहे की इटलीमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी आता अधिक भयंकर परिस्थिती सामना कसा करता येईल यासंदर्भातील तयारी सुरु केली आहे. दिवसोंदिवस करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे तर दुसरीकडे उपलब्ध साधनांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच करोनाग्रस्तांचा आकडा वाढत राहिल्यास अधिकाऱ्यांना भविष्यात “जगण्याची शक्यता असणाऱ्या” रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्राधान्य द्यावं लागेल.

इटलीमधील सरासरी वयोमान अधिक…

इटलीमधील करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी पाहिली तर इटलीचे सरासरी वयोमान हे अधिक असल्याचे दिसून येते. या देशाचे मागील वर्षी सरासरी वयोमान ४५.५ वर्षे इतके होते. युरोपीयन देशांपैकी इटली हा सर्वाधिक सरासरी वयोमान असणाऱ्या नागरिकांचा देश आहे. चीनमधील सरासरी वयोमानापेक्षा इटलीमधील सरासरी वयोमान सात वर्षांनी अधिक आहे. शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार इटलीमध्ये मरण पावलेल्या करोनाच्या रुग्णांचे सरासरी वय हे ७८.५ वर्षे इतकं आहे. येथे करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या साडेपाच हजारहून जास्त आहे तर संसर्ग झालेल्यांची संख्या ५० हजारहून अधिक आहे. इटलीतील करोनाग्रस्त मृतांपैकी ९९ टक्के रुग्णांना आधीपासूनच एका गंभीर आजाराने ग्रासलेलं होतं असही पहाणीमध्ये समोर आलं आहे.

जपान हा जगातील सर्वाधिक सरासरी वय असणारा देश आहे. जपानमधील नागरिकांचे सरासरी वय ४७.३ वर्षे इतके आहे. असं असलं तरी तेथील सरकारने घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे तेथील करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ३५ इतका आहे. त्यामुळे इटलीमधील मृत्यू तांडवासाठी वय हा एकमेव मुद्दा नाहीय हे स्पष्ट होतं. वैज्ञानिकांच्या मते करोना चीननंतर इतर कोणत्याही देशात पसरु शकला असता. “इटलीच का हा सर्वात महत्वाच्या प्रश्न असल्याचे मला वाटते. त्याचे उत्तर कोणतेही विशेष कारण नाही असं देता येईल”, असे मत कॅनडामधील सीबीसी वृत्तवाहिनीशी बोलताना जॉन्स हॉपकिन्स विद्यापिठाचे प्राध्यापक याश्चा मॉन्यूक यांनी व्यक्त केलं आहे. “इटली आणि इतर देशांमध्ये फरक इतकाच आहे की जर्मनी, अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांपेक्षा दहा दिवस आधी इटलीमध्ये करोनाचे रुग्ण सापडले,” असं मॉन्यूक म्हणाले. इटलीमध्ये करोनामुळे साडेपाच हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमधील लॅम्बार्डी प्रांताला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथील ७८ वर्षीय बिल्डर हा करोनामुळे मरण पावलेला युरोपातील पहिला रुग्ण ठरला. इटलीप्रमाणे आता स्पेन आणि फ्रान्समध्येही करोनामुळे मृत्यूचा दर वाढत आहेत. या देशांनी वेळीच योग्य ती खबरदारी घेतली नाही तर इटलीप्रमाणे इथेही करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढेल अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

नक्की वाचा >> Coronavirus: जो मूर्खपणा इटली, जर्मनी, स्पेन व अमेरिकेच्या नागरिकांनी केला तोच भारतीय करतायत

आरोग्य यंत्रणाच कोलमडली

इटलीमधील आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा ही जगातील अव्वल आरोग्य यंत्रणांपैकी एक मानली जाते. मात्र करोनाग्रस्तांचा आकडा वाढत गेला आणि ही यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. करोनाग्रस्तांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी इटलीमधील आरोग्य सेवा कमी पडू लागली त्याचवेळी देशात करोनाचा फैलाव अधिक झाल्याने परिस्थिती आणखीन बिकट झाली. करोना आता दारिद्र्य रेषेखालील लोकवस्ती असणाऱ्या भागांमध्ये पसरेल अशी भिती इटली सरकारला आहे.

कुटुंब व्यवस्थाही जबाबदार?

इटलीमधील कुटुंब व्यवस्थाही काही प्रमाणात या रोगाचा फैलाव होण्यासाठी कारणीभूत असल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. येथील वृद्ध व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहतात. येथे अनेक कुटुंब ही आपल्या वृद्धांच्या संपर्कात येत असतात. ग्रामीण भागातील युवा वर्ग मोठा संख्येने कामासाठी शहरात येतात. मात्र संयुक्त कुटुंब पद्धतीन असल्याने हे तरुण नंतर वयोवृद्ध कुटुंबसदस्यांबरोबरच राहतात. त्यामुळे वयोवृद्धांमध्ये या आजाराचा प्रसार अधिकप्रमाणात झाला. इटलीमधील ग्रामीण भागामध्ये शहरी भागातून गेलेल्या नोकरदारवर्गामुळे करोनाचा प्रसार झाल्याचे सांगितले जाते.

चाचणी हा एकमेव पर्याय

कोवीड-१९ ची चाचणी करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी यंत्रणा आणि सामुग्री नाही हे अनेक देशांना इटलीमधील परिस्थिती पाहिल्यानंतर लक्षात आलं. इटलीमध्ये सुरुवातीला केवळ लक्षणं असणाऱ्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. या उलट दक्षिण कोरियाने दिवसाला १० हजारहून अधिक जणांच्या चाचण्या घेत करोनाला फैलाव रोखण्यात काही प्रमाणात यश मिळवलं. इटलीने केलेला चुका आपण करु नये म्हणून अनेक देश इटलीमधील परिस्थितीचा अभ्यास करत आहेत. अनेक देशांनी खबरदारीचे उपाय म्हणून आधीच शहरे लॉकडाऊन करण्यापासून सार्वजनिक वाहतूक बंद करण्यापर्यंतचे निर्णय घेतले असून आपला देश दुसरा इटली ठरु नये अशीच सर्वांची इच्छा आहे.