इंडोनेशियामधील जावा बेटांवरील केपू गावात सध्या भुतांची चर्चा आहे. या गावामधील रस्त्यांवर भूतं फिरताना दिसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र खरं तर ही भूतं नसून स्थानिक पोलिसांच्या मदतीने गावतील तरुणांनी वयस्कर लोकांनी घरातच थांबावं म्हणून रात्री गस्त घालण्यासाठी काही जणांची नियुक्ती केली आहे. येथील बहुतांशी लोकं हे अंधश्रद्धा मानणारे असल्याने भुतांसारखी कपडे घालून फिरणाऱ्या या लोकांना घाबरून लोकं करोना लॉकडाउनदरम्यान घरीच थांबतील असं गावातील तरुणांचे मत आहे.

“आमच्याकडे भुतांना पॉकाँग असं म्हणतात. लोकांनी घरात थांबावं यासाठी आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळेच आम्ही पॉकाँगच्या मदतीने ही आगळी वेगळी मोहिम राबवली आहे,” असं गावातील तरुणांचा गटातील सदस्य असणाऱ्या अंजार पांकिनिंगीयात्स याने सांगितलं आहे. गावातील तरुणांचा हा गट पोलिसांबरोबर काम करतो. गावातील अधिक अधिक लोकांनी घरात थांबून करोनाचा संसर्ग टाळता यावा यासाठी त्यांनी ही आगळीवेगळी कल्पना अंमलात आणली आहे.

इंडोनेशियामध्ये पॉकाँग हा भुतांचा एक प्रकार आहे. पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेले, तोंडाला पांढरी पावडर लावलेले चेहरे, मोठे डोळे असे या भुतांचे रुप असते. मेलेल्या लोकांच्या आत्मा या पाँकाँगमध्ये असतात असं इंडोनेशियामधील दंतकथामध्ये सांगितलं जातं.

मात्र लोकांनी घरीच थांबावं म्हणून हा उपक्रम राबवला जात असतानाच दुसरीकडे सुरुवातीला याचा वेगळाच परिणाम दिसून आला. पॉकाँगची झकल पाहण्यासाठी अनेकजण घरातून बाहेर पडू लागल्याचे चित्र महिन्याच्या सुरुवातील दिसून आलं. त्यानंतर नियमितपणे पॉकाँगला गावांमधील रस्त्यावर फिरवण्याऐवजी कधीतरी अचानक हे पॉकाँग लोकांना दिसावेत अशी योजना या तरुणांनी आखली. यामध्ये गावातील काही तरुण पांढरे कपडे घालून आणि वेशभूषा करुन पॉकाँगची भूमिका करतात.

इंडोनेशियामध्येही भारताप्रमाणेच राष्ट्रीय लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी लोकांनी घरातच थांबावे, सोशल डिस्टन्सिंग पाळावे असं आवाहन केलं आहे. चीनमधील मृतांची आकडेवारी पाहता अनेक गावांनी लोकं घरातच थांबतील यासाठी काय करता येईल याबद्दल स्वत:च उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

“करोनाचा प्रादुर्भाव आणि संसर्ग कसा थांबवावा हे अद्यापही येथील लोकांना ठाऊक नाही. त्यांना सरकारने दिलेले निर्देश पाळणे आणि घरीच बसणे खूप कठीण जात आहे,” असं केपू गावाचे प्रमुख प्रियाडी सांगतात. मात्र या पॉकाँग कल्पनेचा फायदा होईल असंही ते सांगतात. रॉयटर्सने केलेल्या पहाणीमधून या कल्पनेमुळे लोकं रात्री घराबाहेर निघत नसल्याचे दिसून आलं आहे.