महाराष्ट्र सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकार्याच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी एक ऑनलाइन फॉर्म भरुन द्यावा असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे.

“तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर आम्ही तुम्हाला विनंती करतो की खालील लिंकवर क्लिक करुन फॉर्म भरा. आम्ही ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवून त्यांच्याशी समन्वय साधून हवाई वाहतुकीवरील निर्बंध उठल्यानंतर तातडीने तुम्हाला परत आणण्याची व्यवस्था करु,” असं मुख्यमंत्री कार्यलयाच्या अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या ट्विटबरोबर शेअऱ केलेल्या लिंकवर क्लिक केल्यास एक गुगल फॉर्म ओपन होतो. यामध्ये माहिती देणाऱ्याचा इमेल आयडी, संपूर्ण नाव, कंट्री कोड (+91, +101 फोन क्रमांकासाठी वापरण्यात येणारे कोड), संपर्क क्रमांक, कोणत्या देशातील कोणत्या शहरामध्ये अडकले आहात, परदेशात जाण्याचे कारण काय, पासपोर्ट क्रमांक, व्हिजा कोणत्या प्रकारचा आहे, व्हिजाची मुदत कधी संपत आहे यासारखे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.

७ मे ते १२ मे दरम्यान भारत सरकार संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाची सहा विशेष विमाने पाठवणार आहेत. ही विमाने प्रामुख्याने दक्षिण भारतीय कामगारांना परत आणणार आहे. तेथील ज्या कामगारांनी भारतात परत  येण्यासाठी नोंदणी केली आहे अशा कामगारांना परत आणण्यात येणार आहे. या पैकी पहिली दोन विमाने ही ७ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहेत. आबुधाबी ते कोच्ची आणि दुबई ते काझीकोडे असा या विमानांचा मार्ग असणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये भारत अमेरिका, ब्रिटन, मलेशिया, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करणार आहे.