करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडवच बघायला मिळत आहे. देशाच्या विविध भागात करोनानं हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था ढगमगताना दिसत आहे. देशात दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत असून, गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रत्येकाचीच झोप उडवणारी आहे. देशात अवघ्या २४ तासांत कालावधीत चार हजारांहून अधिक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. ही देशातील एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद असून, २४ तासांत चार लाखांहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

देशात दररोज साडेपाच हजार मृत्यू होतील अशी भीती वजा इशारा अमेरिकेतील इन्स्टिट्यूटने काही दिवसांपूर्वी दिला होता. हा इशारा खरा ठरतोय की, काय अशी शंका गेल्या २४ तासांतील आकडेवारीवरून डोकं वर काढताना दिसत आहे. देशात करोनाचं थैमान सुरू असून, करोनाचा संसर्ग प्रचंड वेगानं वाढत चालला आहे. देशात दररोज चार लाखांच्या आसपास रुग्ण आढळून येत असून, दररोज साडेतीन हजारांच्या सरासरीने मृत्यू होत आहेत. मात्र, गेल्या २४ तासांतील मृतांची संख्या झोप उडवणारी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात २४ तासांत चार लाख एक हजार ७८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख १८ हजार ६०९ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, चिंतेची बाब म्हणजे देशात पहिल्यांदाच चार हजार १८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ३८ हजार २७० इतकी झाली आहे.

कुणी दिला आहे इशारा? काय म्हटलंय अभ्यासात?

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाने काळजाचा ठोका चुकवणारा काही दिवसांपूर्वी दिला होता. देशात मे महिन्याच्या मध्यावधीत दररोज ५ हजाराहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने ((IHME) व्यक्त केलेला आहे. इन्स्टिट्यूटने चालू वर्षात भारतात करोना मृत्यूसंख्या शिखरावर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. १० मे रोजी भारतात ५ हजार ६०० जणांचा करोनामुळे मृत्यूची होईल, असा अंदाज व्यक्त केलेला असून, १२ एप्रिल ते १ ऑगस्ट या कालावधीत देशात ३ लाख २९ हजार जणांचा करोनामुळे मृत्यू होऊ शकतो. तसेच जुलै अखेरीपर्यंत एकूण ६ लाख ६५ हजार मृत्यू होऊ शकतात, असंही इन्स्टिट्यूटने अभ्यासात म्हटलेलं आहे.