लंडन : करोना विषाणूचा डेल्टा हा प्रकार ब्रिटनमध्ये अद्यापही प्रबळ असून, शुक्रवारी देशात करोनाबाधितांच्या संख्येत ५४,२६८ ने वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यापेक्षा ही वाढ ३२ टक्क्यांनी अधिक असल्याचे ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असली, तरी त्या तुलनेने रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण मात्र वाढलेले नसल्याचे आपल्या आठवडी विश्लेषणात दिसून येत आहे, असे पब्लिक हेल्थ इंग्लंडने (पीएचई) सांगितले. करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रांमुळे मोठ्या प्रमाणावर संरक्षण मिळाल्याचे यातून दिसून येते, असेही ते म्हणाले.

वेगळ्या संशोधनात पीएचईला असेही आढळले, की देशात दिल्या जाणाऱ्या सर्व लशी, आरोग्यविषयक समस्या असलेल्या बहुतांश लोकांमध्ये   उर्वरित लोकांप्रमाणेच परिणामकारक ठरत आहेत.

‘करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होऊनही रुग्णालयात दाखल होण्याचे व मृत्यूंचे प्रमाण वाढलेले नाही असे आमच्या आकडेवारीत दिसून येत आहे’, असे यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जेनी हॅरीस यांनी सांगितले. ‘याचे कारण सध्याच्या लशी डेल्टाविरुद्ध मोठ्या प्रमाणात संरक्षण देतात’, असे  ते म्हणाले.