जपानमधील लोकं हे कष्ट करण्याची तयारी आणि मेहनती असल्याने जगभरामध्ये त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. जपानमधील ऑफिसचा कालावधी आणि तेथील कॉर्परेट कल्चरचीही बरीच चर्चा होताना दिसते. मात्र सतत घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या या देशाचाही वेग करोनामुळे मंदावला आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आणीबाणी घोषित केली आहे. त्यामुळे देशातील अनेक व्यवहार ठप्प झालेले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही आणीबाणी जाहीर करण्यात आली असून लोकांना सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्यास सांगण्यात आलं आहे. अनेक कंपन्या बंद असून आणीबाणीच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याच्या किंवा शक्य असल्यास घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अशातही एक कर्मचारी कामला आल्याने संतापलेल्या बॉसने त्याला मारहाण केल्याची घटना जपानमध्ये घडली आहे.

योमीउरी (Yomiuri) या स्थानिक वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, इमारतीचे बांधकाम करणारा एक २० वर्षीय कर्मचारी बंदी घालण्यात आलेली असतानाही मियागी प्रांतामधील शँडीन येथून हा कर्मचारी कंपनीच्या माध्यमातून कऱण्यात बांधकाम सुरु असणाऱ्या यामागाटा प्रांतातील कामाच्या ठिकाणी पोहचला. येथील व्यवस्थापकाने म्हणजेच या तरुणाच्या बॉसने आदल्या दिवशीच सर्व कर्मचाऱ्यांनी घरीच थांबवे, कामावर येऊ नये असा सूचना दिल्या होत्या. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार या व्यवस्थापकाने हे निर्देश दिले होते. असं असतानाही हा कर्मचारी बांधकाम सुरु असणाऱ्या ठिकाणी पोहचला.

४६ वर्षीय व्यवस्थापकाला ही गोष्ट समजल्यानंतर त्याने या कर्मचाऱ्याला फटकारले. संतापलेल्या व्यवस्थापकाने या तरुणाच्या तोंडावर बुक्का मारुन त्याला जखमी केले. यानंतर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत या व्यवस्थापकाला अटक केली आहे.