scorecardresearch

लॉकडाउनपेक्षाही भयंकर; बाल लैंगिक शोषण आणि हिंसाचाराच्या तक्रारींचा खच

चाईल्डलाईन इंडियाची माहिती

लॉकडाउनपेक्षाही भयंकर; बाल लैंगिक शोषण आणि हिंसाचाराच्या तक्रारींचा खच
(संग्रहित छायाचित्र)

करोनामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सगळ्यानाच घरात बसून राहावं लागतं आहे. लॉकडाउनच्या या काळात अनेक वेगळ्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबरोबरच बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. चाईल्डलाईन इंडिया हेल्पलाईनकडे ११ दिवसांच्या काळात तब्बल ९२००० तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे घरातच बालकांना शोषणाचा सामना करावा लागत आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. त्यामुळे जनजीवन ठप्प झालं आहे. प्रत्येक जण घरात असून, या लॉकडाउनच्या काळात लैंगिक शोषण आणि हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. चाईल्डलाईन १०९८ या हेल्पलाईनवर देशभरातून तब्बल तीन लाख ७ हजार तणावग्रस्त बालकांचे कॉल आले. लॉकडाउननंतरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे २० ते ३० मार्च या कालावधीत हे तक्रारींचे कॉल आले. ३० टक्के मुलांनी शौषण आणि हिंसाचारापासून संरक्षण मिळण्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे, चाईल्डलाईन इंडियाचे उपसंचालक हरलीन वालिया यांनी ही माहिती दिली.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर बाललैंगिक शोषणाच्या आणि हिंसाचाराच्या तक्रारींसंदर्भात कॉल ५० टक्क्यांनं वाढल्याचं दिसून आलं. ही माहिती एका कार्यशाळेत जाहीर करण्यात आली. या कार्यशाळेला महिला बालविकास मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते,’ असं वालिया यांनी सांगितलं. याव्यतिरिक्त इतर तक्रारींसंर्दभातही कॉल हेल्पलाईनकडे कॉल आले. यात शारीरिक आरोग्यासंर्दभात ११ टक्के, बाल कामगार ८ टक्के, बेपत्ता आणि घरातून पळून गेलेल्या मुलांसंदर्भात ८ टक्के तक्रारी आल्या दाखल झाल्या आहेत.

दुसरीकडं लॉकडाउनच्या काळात महिला हिंसाचाराच्या घटनाही वाढल्या असल्याचं यापूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितलं होतं. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर या तक्रारींमध्ये दुप्पट वाढ झाल्याचं शर्मा यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-04-2020 at 16:18 IST
ताज्या बातम्या