लग्नासाठी वरात घेऊन निघालेल्या नवरामुलालाच करोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. नवरामुलगा आणि त्याच्या वडिलांना करोनाची लागण झाल्याने लग्नच रद्द करावं लागलं. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. लग्नासाठी वाजत गाजत वरातही निघाली होती. पण नवऱ्यामुलाला करोनाची लागण झाल्याचं कळताच वरात आली त्याच मार्गाने पुन्हा परत पाठवण्यात आली.

१५ जून रोजी नवऱ्यामुलाचं कुटुंब लग्नासाठी दिल्लीहून अमेठी येथं आलं होतं. यावेळी त्यांची करोना चाचणी घेऊन नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. १९ जून रोजी नवरामुलगा आणि त्याचं कुटुंब लग्नासाठी जात असतानाच त्यांचा रिपोर्ट आला. यावेळी नवरामुलगा आणि त्याच्या वडिलांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं. तात्काळ पोलिसांना यासंबंधी माहिती देण्यात आली. यानंतर वरात थांबवण्यात आली. नवरामुलगा आणि त्याच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.