“कोणतीही चूक करु नका, करोना बराच वेळ आपल्यासोबत राहणार आहे”; WHO चा इशारा

करोना व्हायरस बराच वेळ पृथ्वीवर टिकून राहणार आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे

करोना व्हायरस बराच वेळ पृथ्वीवर टिकून राहणार आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. सोबतच अनेक देश अद्यापही करोनाशी लढा देण्याच्या सुरुवातीच्या स्टेजवर असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी सांगितलं आहे की, “जे देश आपण करोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत होते तिथे संख्या वाढत चालली असल्याचं दिसत आहे. तसंच आफ्रिका आणि अमेरिकेतही चिंताजनक वाढ झाली आहे”.

संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य विभागाने अत्यंत योग्य वेळी ३० जानेवारी रोजी जागतिक आणीबाणी जाहीर केली होती. यामुळे अनेक देशांना तयारी करण्यासाठी तसंच करोनाशी लढा देण्यासाठी योजना तयार करण्यासाठी वेळ मिळाला असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. करोनासंबंधी परिस्थिती योग्य हाताळली नसल्याचा आरोप वारंवार अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेवर केला जात आहे.

“पश्चिम युरोपमध्ये परिस्थिती स्थिर किंवा घसरत असल्याचं पहायला मिळत आहे. संख्या कमी असली तरी आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका तसंच पश्चिम युरोपमध्ये चिंता वाढवणारा ट्रेंड आहे,” असंही ते म्हणाले आहेत. “अनेक देश सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. आणि ज्यांना आधीच फटका बसला आहे तिथे संख्या वाढत चालली असल्याचं दिसत आहे,” अशी माहिती टेड्रोस यांनी दिली आहे.

“कोणतीही चूक करु नका. आपल्याला अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. हा व्हायरस आपल्यासोबत बराच वेळ असणार आहे,” असा इशारा टेड्रोस यांनी यावेळी दिला. टेड्रोस यांनी म्हटलं आहे की, “मागे वळून पाहताना आम्ही अत्यंत योग्य वेळी आणीबाणी जाहीर केली असं वाटतं. सर्वांनाच तयारी करण्यासाठी खूप वेळ मिळाला होता”. दरम्यान जगभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ७५ हजार इतकी झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus lockdown world health organisation virus will be with us for long time sgy