scorecardresearch

Coronavirus: भारतात होणार करोनावर संशोधन आणि औषधांची चाचणी

केंद्रीय, राज्य आणि खासगी रुग्णालयांनी प्रयोगशाळांना आवश्यक नमुने उपलब्ध करून देण्याचे निर्देश

Coronavirus: भारतात होणार करोनावर संशोधन आणि औषधांची चाचणी
प्रतिकात्मक छायाचित्र

राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळांना करोना संदर्भातील वैद्यकीय चाचणी करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय, राज्य आणि खासगी रुग्णालयांनी प्रयोगशाळांना आवश्यक नमुने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांच्याकडून हे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्चमधील (आयआयएसईआर) प्रोफेसर संजीव गालांडे यांनी आपणदेखील यामध्ये सहभागी होण्यास इच्छुक असून राष्ट्रीय प्रयोगशाळांना सहकार्य करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे.

केंद्र सरकारने करोना विषाणू संसर्ग चाचणीसाठी सरकारी मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांना परवानगी दिल्यानंतर या चाचण्यांसाठी प्रत्येकी ४५०० ते ५००० रुपये आकारण्यास अनुमती देणार आहे अशी माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने दिली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत मंगळवारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. करोना विषाणूची चाचणी करण्याची मुभा खासगी प्रयोगशाळांना देण्यात येईल, पण कुणीही ही चाचणी मोफत करण्याची तयारी दर्शवलेली नसल्याने त्यासाठी आता ४५०० ते ५००० रुपये इतके शुल्क आकारण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. एकूण ५१ खासगी प्रयोगशाळांना ही चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने म्हटले होते की, पात्र डॉक्टरांनी शिफारस केली तरच खासगी प्रयोगशाळांनी चाचण्या कराव्यात. दरम्यान प्रमाणित संचालन प्रक्रिया प्रयोगशाळांना देण्यास सरकारची तयारी आहे. खासगी संस्थांनीही त्यांच्याकडील चाचण्यांची माहिती एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम म्हणजे आयडीएसपीमध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था व आयसीएमआर यांनी प्रमाणित केलेल्या संचांच्या मदतीने चाचणी करणे अपेक्षित आहे.

आयसीएमआरने आतापर्यंत ७२ प्रयोगशाळात चाचण्यांची सुविधा केली असून नवी दिल्ली राजधानी क्षेत्र व भुवनेश्वर येथे आणखी दोन केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिली. तेथे रोज १४०० नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता उपलब्ध केली जाईल.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2020 at 12:00 IST
ताज्या बातम्या