भारतात गेल्या काही दिवसांपासून करोना (corona) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अटोक्यात आलेला करोना आता पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या २४ तासात देशामध्ये ८ हजार ३२९ नवे करोना रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांची संख्या ४० हजार ३७० वर पोहचली आहे.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार गेल्या २४ तासात ४ हजार २१६ लोक करोनामुक्त झाले आहेत. मात्र, १० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या ३ महिन्यात करोना रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती. मात्र, गेल्या बुधवारी एकाच दिवसाता ५ हजारहून अधिक करोना रुग्ण आढळून आले आहेत. देशात एकूण करोनाबाधितांचा आकडा ४ कोटी ४२ लाखांवर पोहचला आहे. तर करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ लाख २४ हजार ७४७ आहे.

महाराष्ट्रातही करोना रुग्णांमध्ये वाढ

महाराष्ट्रातही करोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ३ हजार ८१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. केवळ मुंबईतच १ हजार ९५६ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. या अगोदर मंगळवारी मुंबईत १२४२ नव्या करोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी आढळलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत ही रुग्णसंख्या अधिक आहे.