करोनाच्या नव्या प्रकाराची दहशत, युरोपातील बहुतांश देशांनी UK ची विमानं केली रद्द

मात्र, भारताकडून अद्याप ब्रिटनच्या विमान उड्डाणांवर बंदी घालण्याचा कोणताही निर्णय नाही…

( विमानतळाचं प्रातिनिधिक छायाचित्र, सौजन्य – AP Photo/Peter Dejong)

एकीकडे जीवघेण्या करोना व्हायरससाठी आता कुठे लस बाजारात येण्याची चिन्हे असतानाच करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा करोना विषाणू आढळला असल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे ब्रिटनच्या शेजारील आणि युरोपीयन देश सतर्क झाले आहेत.

ब्रिटनमध्ये मागील काही दिवसांपासून नव्या प्रकारच्या संसर्गाने बाधित झालेल्यांची संख्या वाढत आहे. नव्या प्रकारच्या विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे युरोपीयन देशांसह इतर देशांनीही ब्रिटनमधील विमान सेवेवर बंदी घातली आहे. करोनाचा हा नवीन प्रकार फक्त ब्रिटनपुरता मर्यादित न राहता इटली, नेदरलँड्स, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत पसरत आहे. परिणामी कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, ऑस्ट्रिया, आयलँड, बुल्गेरिया आणि सौदी अरेबिया या देशांनी ब्रिटनला जाणाऱ्या विमानांवर तात्पुरती बंदी घातली आहे.

आणखी वाचा- ‘चिंता करण्याची आवश्यकता नाही’, करोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांचे विधान

दरम्यान, भारताकडून अद्याप ब्रिटनच्या विमान उड्डाणांवर बंदी घालण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ब्रिटनमध्ये सापडलेल्या करोनाच्या नवीन स्ट्रेनला भारतात येण्यापासून रोखण्यासाठी तात्काळ पाऊलं उचलली जावी अशी मागणी केली जात आहे. काँग्रेसने ब्रिटनची सगळी उड्डानं रद्द करण्याची मागणी केली आहे. भारतात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तातडीची बैठक बोलावली आहे. आज ही बैठक होत असून, आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होणार आहेत. एकूणच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus new covid 19 variant in united kingdom europe flights ban sas