जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात अद्यापही वाढतच आहे. सर्व सामान्य जनतेबरोबरच प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले पोलीस, डॉक्टर, परिचारीकांसह सीमेवर लढणारे जवान देखील करोनाच्या विळख्यात सापडल्याचे दिसत आहे.   मागील 24 तासांत बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्सचे (बीएसएफ) नऊ जवान व इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस दलाचे दोन जवान करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या बीएसएफच्या नऊ जवानांमध्ये दिल्लीचे 6 जण, कोलकाता -1 व त्रिपूराच्या दोन जवानांचा समावेश आहे. या सर्वांवर कोविड स्पेशल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

तर आज आयटीबीपीचे दोन जवान पॉझिटिव्ह आढळल्याने आता आयटीबीपीच्या एकूण करोना पॉझिटिव्ह जवनांची संख्या 159 झाली आहे. तर एकजण उपचारानंतर बरा झालेला आहे.

राज्यातील काही कारागृहांमध्येही करोनाचा संसर्ग झाल्याचं दिसून आलं होतं. मुंबईतील ऑर्थर रोड जेल, भायखळातील महिला कारागृह, पुण्यातील येरवडा कारागृहात काही कैद्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. त्यानंतर राज्य सरकारनं या कैद्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. या पार्श्वभूमीवर कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या समितीनं राज्यातील ५० टक्के कैद्यांना तुरूंगातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेनं अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.