नवी दिल्ली : रुग्णसंपर्कातील व्यक्ती अतिजोखमीच्या गटातील नसेल तर त्यास करोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असा दिलासादायक निर्णय केंद्राने घेतला आह़े 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना चाचण्यांसंदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या आहेत़  करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींनाही चाचणी करावी लागत़े मात्र, रुग्णसंपर्कातील व्यक्ती वयोवृध्द अणि सहव्याधीग्रस्त नसेल तर चाचणी करण्याची गरज नाही़  तसेच आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांनाही करोना चाचणी बंधनकारक नाही, असे ‘आयसीएमआर’ने स्पष्ट केल़े

तत्त्पूर्वी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रुग्णांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या़ त्यानुसार करोना संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना बाधित असल्याचे आढळल्यानंतर सातव्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडणे शक्य होणार आहे. रुग्ण बाधित आल्यानंतर सलग तीन दिवस त्याला ताप नसेल तर चाचणी न करता त्याला घरी सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

रुग्णांना घरी सोडल्यानंतर पुढील सात दिवस त्यांनी आपल्या लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे, तसेच घरी राहतानाही मुखपट्टीचा वापर करावा. घरी सोडल्यानंतर ताप, खोकला, श्वास घेण्यात अडचण यांपैकी कोणतेही लक्षण सौम्य किंवा तीव्र स्वरूपात जाणवल्यास त्या रुग्णाने डॉक्टरांशी संपर्क साधावा. मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी सलग तीन दिवस ९३ आणि त्याहून अधिक राहिल्यास त्या रुग्णांना घरी सोडण्यात यावे, असेही या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या रुग्णांचा निर्णय डॉक्टर घेणार

एचआयव्ही, कर्करोग, अवयव प्रत्यारोपण अशा गंभीर सहव्याधींची पार्श्वभूमी असलेल्या करोना रुग्णांना घरी सोडण्याबाबतचा निर्णय पूर्णपणे त्यांच्या डॉक्टरांवर सोपवण्यात आला आहे. ज्या रुग्णांची प्रकृती स्थिर असेल, त्यांच्या सहव्याधी बळावल्या नसतील आणि प्राणवायूची पातळी स्थिर असेल तसेच कृत्रिम श्वासोच्छवासाशिवाय ती पातळी कायम राहत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना घरी सोडणे शक्य असल्याचे या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

५-१० टक्के रुग्णालयात उपचारांची गरज

नवी दिल्ली : करोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत ५-१० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आह़े  हे प्रमाण दुसऱ्या लाटेमध्ये २०-२३ टक्के होते. रुग्णालयातील उपचाराधीन रुग्णांची संख्या तुलनेत कमी असली तरी, अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉन तसेच डेल्टाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारांनी सतर्क राहावे, असा इशारा केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सोमवारी सर्व राज्यांना पत्राद्वारे दिला.

राज्यात ४९,५२४ नागरिकांना वर्धक मात्रा

मुंबई : राज्यात आरोग्य, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ६० वर्षांवरील दीर्घकालीन आजार असलेले नागरिक यांना करोना लशीची वर्धक मात्रा देण्यास सोमवारपासून सुरूवात झाली़  पहिल्या दिवशी राज्यभरात ४९ हजार ५२४ जणांनी तर मुंबईत १० हजार ७४१ जणांनी वर्धक मात्रा घेतली. दुसऱ्या मात्रेनंतर नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्ती वर्धक मात्रेसाठी पात्र असणार आहेत. राज्यभरात सुमारे २९ लाख ९ हजार ६०० ज्येष्ठ नागरिक या मात्रेसाठी पात्र आहेत.

राज्यात करोनाचे ३३ हजार नवे रुग्ण

मुंबई : राज्यात सोमवारी दिवसभरात ३३ हजार ४७० करोना रुग्णांचे निदान झाले. दिवसभरात २९ हजार ६७१ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतल़े राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन लाखाच्या पुढे गेल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढू लागला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus rt pcr tests new rules for covid testing introduced by centre zws
First published on: 11-01-2022 at 04:32 IST