करोनापेक्षाही भयानक रोग ज्याने घेतला होता पाच कोटी लोकांचा जीव

जागतिक लोकसंख्येच्या १.७ टक्के लोक दगावले

चीनसह जगभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणूने भारतात पहिला बळी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या वृद्धास करोनाची लागण झाली होती, असे गुरुवारी स्पष्ट झाले. तर महाराष्ट्रातील करोनाच्या रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली. देशातील करोनाबाधितांची संख्या शुक्रवारी ८० वर पोहोचली आहे. करोनामुळे जगभरामध्ये भितीचे वातावरण असून अनेकजण सार्वजनिक ठिकाणी जाताना तोंडावर मास्क लावून वावरताना दिसत आहेत. अनेकांनी आपल्या परदेश वाऱ्या रद्द केल्या आहेत. मात्र अशाप्रकारे जगभरात आपली दहशत निर्माण करणारा करोना हा काही पहिला संसर्गजन्य आजार नाही. याआधी ‘स्पॅनिश फ्लू’ नावाच्या आजारानेही अशाप्रकारे जगभरात भितीचे वातावरण निर्माण केलं होतं.

अमेरिकेमध्ये १९१८ साली मार्च महिन्यात ‘स्पॅनिश फ्लू’चे पहिले काही रुग्ण अढळून आले होते. सध्या ज्याप्रकारे तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं आहे तसं त्यावेळी नव्हतं. समुद्र मार्गाने सर्वाधिक वाहतूक होणाऱ्या काळामध्ये जहाजांमधूनच एका देशांतून दुसऱ्या देशात प्रवास व्हायचा. तरीही ‘स्पॅनिश फ्लू’ हा रोग झपाट्याने पसरला होता.

‘स्पॅनिश फ्लू’ हे नाव वाचून या आजाराचे उगमस्थान स्पेन देशात असेल असं तुम्हाला वाटलं असेल तर जरा थांबा. या आजाराचे उगमस्थान अमेरिकेत होतं. मात्र या आजाराला ‘स्पॅनिश फ्लू’ नाव कसं पडलं यामागे एक रंजक कथा आहे. हा आजार पसरू लागला तो काळ पहिल्या महायुद्धाचा होता. हा आजार अनेक देशांमध्ये पसरला होता जे दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी होते. मात्र युद्धात सहभागी झालेल्या आपल्या सैनिकांचे मनोधैर्य कायम ठेवण्यासाठी या आजारासंदर्भातील बातम्या युद्धात सहभागी असणाऱ्या देशांनी समोर येऊ न देता त्या दाबून ठेवल्या. मात्र त्याचवेळी स्पेनने पहिल्या महायुद्धामध्ये तटस्थ भूमिका घेतली होती. जगभरात पसरणारा हा आजार स्पेनमध्येही हळूहळू पसरु लागला. मात्र स्पेनने इतर देशांप्रमाणे बातम्या सामान्यांपासून लपवून न ठेवता आपल्या देशात हा आजार पसरत असल्याचे मान्य केलं. त्यामुळेच या आजाराला ‘स्पॅनिश फ्लू’ असं नाव पडलं.

‘स्पॅनिश फ्लू’चे उगमस्थान अमेरिकेत असल्याचे सामान्यपणे म्हटलं जातं तरी यामध्ये मतमतांतरे आहेत. काहीजण अमेरिकेत या आजाराची सुरुवात झाल्याचे सांगतात तर काही जण फ्रान्समधील ब्रिटीश लष्कराच्या छावणीमधून हा आजार पसरण्यास सुरुवात झाल्याचे म्हणतात. नुकत्याच समोर आलेल्या एका नवीन तर्कानुसार ‘स्पॅनिश फ्लू’चा फैलाव होण्यासाठी चीन कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे. नवीन तर्कांनुसार ‘स्पॅनिश फ्लू’ची सुरुवात १९१७ च्या शेवटच्या महिन्यांमध्ये उत्तर चीनमध्ये झाली. चीनमधून हा आजार पश्चिम युरोपमध्ये पसरला. त्यावेळी फ्रान्स आणि ब्रिटनसारख्या प्रगत देशांमध्ये कामासाठी मजदूर म्हणून चीनी लोकांना आणले जायचे. नोकरी आणि मजूरी अशा वेगवेगळ्या कामांसाठी त्याकाळी एक लाखांहून अधिक चीनी कामगार ब्रिटन आणि फ्रान्समध्ये होते. याच कर्मचाऱ्यांमुळे हा आजार युरोपमध्ये पसरला.

बघता बघता ‘स्पॅनिश फ्लू’ ही महामारी अलास्कामधील दूर्गम भागांमध्येही पसरली. जवळजवळ दोन वर्ष या आजाराचा प्रसार होत होता. सैनिकांना या आजाराचा सर्वाधिक फटका बसल्याचे बोलले जाते. पहिले महायुद्ध सुरु असल्याने वेगवेगळ्या देशाच्या लष्करी छावणीमधील सैनिकांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याचे बोलले जाते. सैनिकांच्या छावणीजवळ अनेकदा अस्वच्छता असल्याने लष्करी छावण्यांमध्ये हा आजार वेगाने पसरत होता. सैनिक जेव्हा आपल्या मायदेशी जायचे तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर या रोगाचे विषाणूही नेले आणि हा आजार पसरत गेला.

या ‘स्पॅनिश फ्लू’मुळे मरण पावलेल्यांच्या आकडेवारीबद्दलही अनेक अंदाज व्यक्त केले जातात. एका अंदाजानुसार ‘स्पॅनिश फ्लू’मुळे चार ते पाच कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच त्यावेळी असणाऱ्या जागतिक लोकसंख्येच्या १.७ टक्के लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Coronavirus spanish flu the deadliest pandemic in history scsg

ताज्या बातम्या