उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तबलिगी जमातच्या सदस्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय योग्यच होता असं मत व्यक्त केलं आहे. राज्य सरकराने घेतलेल्या या निर्णयाचे समर्थन करताना योगी यांनी, “तबलिगी जमातच्या सदस्यांविरोधात वेळीच कारवाई केली नसती तर उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये अराजकतेचा तांडव माजला असता. आम्ही काही मुठभर लोकांसाठी २३ कोटी लोकांच्या आयुष्याशी खेळण्याची सूट देऊ शकत नव्हतो. म्हणूनच कायद्यानुसार आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई केली,” असं म्हटलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये योगींनी तबलिगी जमातसंदर्भातील कारवाईबद्दल भाष्य केलं. “तबलिगी जमातच्या सदस्यांमुळे करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये अडचणी निर्माण झाल्या. अशा लोकांविरोधात आम्ही कारवाई केली. त्याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही दिल्लीलाही काही जणांना पाठवलं होतं,” असंही योगी यांनी स्पष्ट केलं आहे.

तबलिगींसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी काही जणांच्या बेजबाबदार वागण्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती असं सांगितलं. “तबलिगी जमातच्या सदस्यांना करोनाचा संसर्ग होणे हा काही अपराध नाही. मात्र हा आजार लपवल्याने संसर्ग वाढू शकतो आणि त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो हे ठाऊक असतानाही तशी परिस्थिती निर्माण होण्यासारखी वागणूक असणं गुन्हाच समजला पाहिजे. तबलिगी जमातच्या काही लोकांनी हा गुन्हा केला आहे. एकीकडे सरकार तबलिगी जमातच्या लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये आणून त्यांची तपासणी केली जात होती. दुसरीकडे त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही या लोकांनी क्वारंटाइन सेंटरमध्ये आणि कोवीड रुग्णालयांमध्ये ज्या प्रकारे उद्धटपणे वर्तवणूक केली आणि चुकीच्या पद्धतीने वागले, मारहाण केली, पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर थुंकण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याने त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्यावर कारवाई केली नसती तर उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये अराजकतेचा तांडव माजला असता. आम्ही काही मुठभर लोकांना २३ कोटी लोकांच्या आयुष्याषी खेळू देऊ शकलो नसतो. म्हणून आम्ही कायद्यामध्ये राहून त्यांच्यावर कारवाई केली,” असं योगींनी स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> “करोना संकटाच्या काळात भारताला मोदींसारखे नेतृत्व लाभले हे देशाचे नशीबच”

भविष्यातही कायदा हातात घेणाऱ्या आणि कायद्याविरुद्ध वागणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल असा इशाराही योगींनी या मुलाखतीमध्ये दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रत्येक गोष्टीकडे सांप्रदायिकतेच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचे सांगत त्यांच्यावर टीका केली. “प्रत्येक गोष्टीकडे सांप्रदायिकतेच्या नजरेतून पाहणाऱ्यांनी तबलिगी जमातच्या सदस्यांना क्लीन चीट दिली आहे. अशा लोकांनी देशातील जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचं काम केलं आहे. यासाठी जनता त्यांना कधी माफ करणार नाही,” अशा शब्दांमध्ये योगींनी आपले मत व्यक्त केलं.

याचबरोबर करोनाची संसर्ग साखळी तोडणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मतही योगी यांनी व्यक्त केलं. उत्तर प्रदेश सरकारने कोट्टामध्ये अडकलेल्या १५०० हजार विद्यार्थ्यांना आम्ही राज्यामध्ये परत आणलं असं सांगतानाच राज्य सरकारने पाच कोटी लोकांचे सॅनिंग केल्याची माहितीही योगींनी या मुलाखतीमध्ये दिली.