जगभरातील १८० हून अधिक देशामध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे जगभरामध्ये एक लाख १० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमधील वुहान शहरामधून जगभरामध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. त्यानंतर चीनने जंगली प्राण्यांची मांस विक्री होणाऱ्या बाजारामधून या विषाणूचा संसर्ग मानवाला झाल्याचा दावा चीनने केला. त्यानंतर हा विषाणू वटवाघुळांमधून मानवामध्ये आल्याचे सांगण्यात आलं. दरम्यान चीनमधील वुहान शहरातील एका प्रयोगशाळेसंदर्भात शंका व्यक्त करण्यात आली. मांसविक्री करणाऱ्या बाजांरापासून काही किलोमीटरवर असणारी ही प्रयोगशाळा ही चीनमधील सर्वात मोठी प्रयोगशाळा असल्याचे समजते. आता या चर्चेत असणाऱ्या प्रयोगशाळेला अमेरिकेनेच निधी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डेली मेलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

वुहानमधील या प्रयोगशाळेशी संबंधित काही कागदपत्रांच्या आधारे डेली मेलने एक धक्कादायक वृत्त दिलं आहे. या कागदपत्रांनुसार अमेरिकन सरकारने विषाणूंवर संशोधन करणाऱ्या या प्रयोगशाळेला २८ कोटींचा निधी दिला होता. मागील अनेक वर्षामध्ये तुकड्या तुकड्यामध्ये हा निधी देण्यात आला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर अमेरिकेतील नेत्यांनाही मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.

करोना विषाणूचा जगभरामध्ये प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेकांनी चीनसंदर्भात अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. वुहान येथील व्हायरोलॉजी इन्स्टीट्यूटमध्ये (Wuhan Institute of Virology) प्रयोगादरम्यान करोनाचा विषाणू पसरला गेल्याची शंका अनेकांनी व्यक्त केली आहे. या विषाणूचा संसर्ग नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्यानंतर चीनने याचा संसर्ग मांसविक्री होणाऱ्या बाजारातून झाल्याची माहिती दिली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या अध्यक्षतेखालील ‘कोबरा’ या आपत्कालीन गटातील सदस्यानेही वुहानमधील प्रयोगशाळेतून विषाणू पसरत गेल्याचे तर्क विश्वास ठेवण्यासारखे असल्याचे मत नोंदवलं होतं.

अमेरिकेतून चीनमधील प्रयोगशाळेला मदत केली जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर अमेरिकेतील काही नेत्यांनी याला विरोध केला आहे. प्राण्यांवर होणाऱ्या धोकादायक आणि हिंसक प्रयोगांसाठी अमेरिकन सरकारने निधी दिल्याचा आरोप काही नेत्यांनी केला आहे.

अमेरिकेतील नॅश्नल इंन्स्टीट्यूट ऑफ हेल्थने वुहानमधील वायरोलॉजी इंन्स्टीट्यूटला २८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. “कदाचित जगभरामध्ये करोना विषाणूचा संसर्ग होण्यामागे चीनमधील ज्या प्रयोगशाळेचा संबंध आहे त्या प्रयोगशाळेला अमेरिकेने निधी दिला आहे हे समजल्यानंतर मला खूप दुख: झालं,” असं मत अमेरिकेतील खासदार मॅट गेट्स यांनी नोंदवलं आहे.

शनिवारी अमेरिकेतील ‘व्हाइट कोट वेस्ट’ य़ा विचारवंताच्या गटाचे अध्यक्ष अँथनी बेलॉटी यांनाही अमेरिकेने चीनला मदत केल्याच्या वृत्तावरुन अमेरिकन सरकारवर टीका केली आहे. “चीनमधील या प्रयोगशाळेमध्ये काही प्राण्यांवर विषाणूची चाचणी झाली असेल. त्यानंतर या प्राण्यांना जंगली प्राण्यांचे मांस मिळणाऱ्या बाजारामध्ये विकण्यात आलं असेल,” अशी शंका अँथनी यांनी व्यक्त केली आहे.