करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना गेल्या चार दिवसांत ९११ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. करोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर १००० जणांच्या मृत्यूची नोंद होण्यासाठी ४८ दिवस लागले होते. तिथे ही संख्या गेल्या चार दिवसांत पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरुनच ही बाब समोर आली आहे. यावरुन भारतात करोनाचा फैलाव अद्यापही नियंत्रणात नसल्याचं समोर येत आहे.

करोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजारांवर पोहोचण्यासाठी ८७ दिवस लागले होते. २६ एप्रिलला भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजार होती. पण यामध्ये वेगाने वाढ होत असून फक्त सहा आठवड्यात रुग्णसंख्या २ लाख २६ हजार ७७० वर पोहोचली आहे.

भारतात १२ मार्च रोजी पहिल्या करोना रुग्णाची नोंद झाली होती. २९ एप्रिल रोजी भारतात मृतांची संख्या एक हजारावर पोहोचली होती. पण काही आठड्यातच ही संख्या ६०७५ इतकी झाली आहे. ४ जूनपर्यंतची आकडेवारी पाहता फक्त गेल्या चार दिवसांत ९०० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाउनचे नियम शिथील करत असताना समोर येणारी ही आकडेवारी चिंताजनक असून भीती वाढवणारी आहे.

केंद्र सरकारने तब्बल दोन महिन्यांनंतर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारने धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही नियम व अटी सरकारकडून घालण्यात आल्या आहेत. हॉटेल खुली करण्याची परवानगी देतानाच सरकारनं करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही महत्त्वाचे नियम घातले आहेत. यात ग्राहकाने स्वतःच्या मेडिकल व ट्रॅव्हल हिस्ट्रीची माहिती देणं अनिवार्य केलं आहे.

काय आहेत नियम…
– हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेल्या ग्राहकानं स्वतःची मेडिकल हिस्ट्री व ट्रॅव्हल हिस्ट्री याची माहिती देणं बंधनकारक आहे. हॉटेलमधील वॉशरुम स्वच्छ ठेवण्यात यावे.
–हॉटेलमधील कर्मचाऱ्याच्या जाण्या येण्यासाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्यात यावे. त्याचबरोबर वयस्कर कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना लोकांच्या संपर्कात येण्यापासून टाळावं.
–हॉटेलमधील एसी सुरू ठेवण्याबद्दल सरकारकडून महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या नियमांनुसार हॉटेलमधील तापमान संतुलित ठेवण्यासाठी एसी २४ ते ३० डिग्रीमध्ये ठेवावा. त्याचबरोबर ४० ते ७० आद्रता राहिल याची काळजी घ्यावी.

रेस्तराँसाठी हे आहेत नियम
–खाद्यपदार्थाची डिलिव्हरी करणाऱ्या तरुणानं हातात पार्सल देणं टाळावं. त्याऐवजी दरवाज्यावर किंवा टेबलावर ठेवावं.
–रेस्टॉरंटच्या एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना प्रवेश द्यावा. त्यामध्ये सोशल डिस्टसिंगचं पालन केलं जावं.
–ग्राहक रेस्टॉरंटमधून गेल्यानंतर तो ज्या ठिकाणी बसला आहे, ती जागा सॅनिटाइज करणं बंधनकारक आहे.