थोर आसामी योद्धे लाचित बरफुकन यांच्या ४०० व्या जयंती कार्यक्रमात प्रतिपादन

नवी दिल्ली : भारताचा इतिहास गुलामीचा नव्हे तर, योद्धय़ांचा, त्यांच्या शौर्याचा, विजयाचा आहे. देशाचा इतिहास अत्याचारी राज्यकर्त्यांविरोधातील अभूतपूर्व पराक्रमांचा आहे. पण, हा वीरांचा इतिहास जाणीवपूर्वक लपवला गेला. आता ही चूक दुरुस्त केली जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मुघलांविरोधात लढलेल्या आसाममधील अहोम साम्राज्याचे सेनापती लाचित बरफुकन यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त दिल्लीच्या विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. त्या वेळी मोदी बोलत होते.

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
sonam wangchuk china march
सोनम वांगचुक यांचा मोठा दावा; म्हणाले, “चीननं भारताचा मोठा भूभाग…”
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?

भारताचा इतिहास यशाचा, युद्धाचा, त्यागाचा, वीरता, बलिदानाचा, महान परंपरांचा आहे. पण, स्वातंत्र्यानंतरही आपल्याला गुलामीच्या काळात मुद्दामहून रचलेला इतिहास शिकवला गेला. लाचित बरफुकन यांचे शौर्य महत्त्वाचे नाही का? आसामच्या लोकांनी मुघलांच्या अत्याचाराविरोधात दिलेला लढा महत्त्वाचा नाही का, असा प्रश्न उपस्थित करत मोदींनी डाव्या विचारांच्या इतिहासकारांवर तीव्र टीका केली.  छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे ‘जाणता राजा’ हे  महानाटय़ अत्यंत प्रभावी आहे. दीडशे-दोनशे कलाकारांचा संच, हत्ती-घोडे यांचाही महानाटय़ात समावेश असतो. लाचन बरफुकन यांच्या आयुष्यावरही असेच महानाटय़ निर्माण करून देशाच्या कानाकोपऱ्यात त्याचे नाटय़प्रयोग झाले पाहिजेत, अशी सूचनाही मोदींनी केली.

गेले वर्षभर आयोजित करण्यात आलेल्या बरफुकन यांच्या चौथ्या शतकमहोत्सवी जयंती महोत्सवाचा समारोप होत असून त्यानिमित्त दिल्लीत तीन दिवस कार्यक्रम होत आहेत. गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जयंती समारंभ आयोजित केला होता. ‘इतिहासकारांनी भारताचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिला असे मी नेहमी ऐकतो पण, आता इतिहासाचे पुनर्लेखन केले पाहिजे आणि पुनर्लेखनापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही’, या मताचा शहा यांनी पुनरुच्चार केला.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश भौगोलिकदृष्टय़ा एकत्र जोडला. पण, देशाचा आत्मा एकत्र जोडण्याचे बहुमूल्य कार्य पंतप्रधान मोदी करत आहेत. दक्षिणेतील लोक ‘तमीळ संगमा’साठी उत्तरेत काशीला येतात. आसामचे लोक कृष्ण-रुख्मिणीच्या विवाहाचे स्मरण करण्यासाठी सवाई माधोपूरला जात आहेत. लाचित बरफुकन यांच्या शौर्यामुळे औरंगजेबाचे साम्राज्य विस्ताराचे स्वप्न धुळीला मिळाले होते. देशाची महान संस्कृती जतन करण्याचे लाचित बरफुकन यांचे स्वप्न पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत, असेही शर्मा म्हणाले.

‘इतिहास फक्त औरंगजेब, बाबरचा नसून छत्रपती शिवाजी, बरफुकन यांच्या शौर्याचा’

देशाचा इतिहास फक्त औरंगजेब, बाबर, जहांगीर किंवा हुमायूनचा नसून तो छत्रपती शिवाजी महाराज, लाचित बरफुकन, गुरू गोविंद सिंग, दुर्गादास राठोड यांच्या शौर्याचा आहे. भारताच्या इतिहासाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहावे, ही इतिहासकारांना नम्र विनंती आहे. तरच विश्वगुरू बनवण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल, असे प्रतिपादन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी शुक्रवारी केले. लाचित बरफुकन यांच्या शौर्यगाथा देशासमोर आणण्याचा आम्ही (आसाम सरकार) प्रयत्न करत आहोत. पण, हे प्रयत्न पुरेसे ठरत नाहीत. भारताच्या या शौर्यगाथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनतेने आणि इतिहासकारांनीही प्रयत्न केले पाहिजेत, असे शर्मा म्हणाले.