सरकारवर गेल्या तीन वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही

यापूर्वी अनेकदा सरकार पडले त्यामागील प्रमुख कारण हे भ्रष्टाचार होते, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित)

मोदींचे अमेरिकेत स्पष्टीकरण

आपल्या सरकारवर गेल्या तीन वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे स्पष्ट केले. यापूर्वी अनेकदा सरकार पडले त्यामागील प्रमुख कारण हे भ्रष्टाचार होते, असेही ते म्हणाले.

भारतीय नागरिकांना भ्रष्टाचाराचा तिरस्कार आहे, असे मोदी यांनी व्हिर्जिनिया येथे भारतीय-अमेरिकी समाजातील एका स्वागत समारंभात सांगितले. आपले सरकार भारताला एका वेगळ्या उंचीवर नऊन ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करील, गेल्या तीन वर्षांत आपल्या सरकारने काम केले असून आतापर्यंत सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप करण्यात आलेला नाही, असे ते म्हणाले. तंत्रज्ञानाने पारदर्शकता आणली आहे आणि सर्व क्षेत्रांत सर्वोच्च स्थान गाठण्यासाठी त्याचाच वापर केला जात आहे, असेही मोदी यांनी अधोरेखित केले. अंतराळ असो वा कृषी क्षेत्र, भारताने तंत्रज्ञानाच्या सहकार्याने भारताने लक्षणीय कामगिरी केली आहे, तंत्रज्ञानावर आधारित कारभार आणि विकास याकडे नव्याने लक्ष दिले जाणार आहे, असेही ते म्हणाले.

वेगवेगळ्या प्रकारच्या मापदंडांचा विचार करता भारत झपाटय़ाने प्रगती करीत आहे, विकासासाठी पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत, भारतीय जनतेच्या इच्छाआकांक्षांचे रूपांतर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करीत आहोत, असे मोदी यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले. भारतात परदेशी थेट गुंतवणूक मोठय़ा प्रमाणावर येत आहे, जग आज भारताकडे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहात आहे, असेही ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corruption narendra modi modi government