Indian woman fined in Singapore for feeding pigeons: सिंगापूरमध्ये कबुतरांना रस्त्यावर खायला टाकणं भारतीय वंशाच्या महिलेला चांगलंच भोवलं आहे. ७१ वर्षाय महिलेला कोर्टाने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कबुतरांना रस्त्यावर खायला टाकण्यावरुन प्रशासनाकडून महिलेला वारंवार बजावण्यात आले होते. पण, सूचना देऊन देखील तिने कबुतरांना खायला टाकण्यास बंद न केल्याने तिच्यावर खटला चालवून दंड ठोठावण्यात आला.
दोन लाख २६ हजार रुपये एवढा दंड
सन्मूगामनाथन शामला (७१) असे या भारतीय वंशाच्या महिलेचे नाव आहे. सिंगापूर वन्यजीव कायद्यानुसार महिलेला दोन लाख २६ हजार रुपये (३,२०० सिंगापूर डॉलर) एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. महिलेला दंडा ठोठवताना तिच्यावरील पूर्वीचे पाच गुन्हे देखील विचारात घेण्यात आले आहेत. याबाबतचे वृत्त न्यूज आशियाने प्रसिद्ध केले आहे.
दोन आरोप
कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, शामला या गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या घराजवळील परिसरात कबुतरांना खायला टाकत आहेत. महिलेने या प्रकारचा गुन्हा यापूर्वी देखील केला आहे. मे २०२५ मध्ये याप्रकरणी महिलेला १,२०० सिंगापूर डॉलर रुपये दंड ठोठावण्यात आला होता. महिलेविरोधात वन्य पक्षांना खायला टाकणे आणि राष्ट्रीय उद्यान मंडळाच्या कबुतरखाना मोहिमेत हस्तक्षेप केल्याचा आरोप तिच्याविरोधात करण्यात आला.
सूचना देऊनही वारंवार गुन्हा
यानंतर देखील महिला या भागातच कबुतरांना खायला टाकत असल्याचे दिसून आले. रस्त्यावर महिला धान्य आणि ब्रेडचे तुकडे टाकत असल्याचे अधिकाऱ्यांनी पाहिले होते. महिलेविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपत्रानुसार, महिला रात्रीच्या वेळेत घराजवळीत भागात कबुतरांना खायला टाकत असल्याचे दिसून आले आहे. सुनावणी सुरु असताना महिलेने तिच्याविरोधातील आरोप फेटाळून लावत पुरावा मागितला. यावेळी कोर्टात चार व्हिडिओ पुरावे सादर करण्यात आले. कबुतरांना खायला टाकत असतान महिला तिथेच उभी असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
तीनच दिवसांत पुन्हा केली चूक
महिला हाच गुन्हा वारंवार करत आहे. महिला कायद्याचे वारंवार उल्लंघन करत आहे, असे कोर्टात सरकारी वकिलांनी बाजू मांडताना म्हटले. महिलेने यापूर्वी दिलेल्या सूचनेनंतर पुन्हा अशी चूक करणार नाही, अशी हमी दिली होती. पण, यानंतर तीनच दिवसात महिला पुन्हा कबुतरांना खायला टाकताना दिसून आली.
दंड कमी करण्याची विनंती
शामला स्वत:च कोर्टात बाजू मांडली. महिलेने तिच्याकडे रोजगार आणि विमाही नसल्याचे कोर्टात सांगितले. दंडाची रक्कम १ ते दोन हजार सिंगापूर डॉलर एवढी होईल का? अशीही विनंती केली. दंडाच्या बदल्यात सामाजिक कार्य अथवा सेवा करेन अशी विनंती महिलेने कोर्टाकडे केली. सिंगापूर वन्यजीव कायद्यानुसार वारंवार सूचना देऊन देखील जाणीवपूर्वक कोणी पक्षांना खायला टाकत असेल तर, प्रत्येक तक्रारीवर संबंधित व्यक्तीला १० हजार सिंगापूर डॉलर एवढा दंड भरावा लागतो.

