देशातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. शनिवारी देशात २८ हजार ३२६ करोनाबाधित आढळले होते. तर, रविवारच्या रुग्णसंख्येत त्यापेक्षाही घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी देशभरात २६ हजार ४१ करोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून २७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २९ हजार ६२१ बाधितांनी करोनावर मात केली आहे.  देशातील रिकव्हरी रेट सध्या ९७.७८ टक्क्यांवर आहे.

नवीन करोना रुग्णांसह देशातील एकूण बाधितांची संख्या ३ कोटी ३६ लाख ७८ हजार ७८६ झाली आहे. त्यापैकी ३ कोटी २९ लाख ३१ हजार ९७२ जण करोनातून बरे झाले असून ४ लाख ४७ हजार १९४ जणांना या विषाणूमुळे जीव गमवावा लागला आहे. तर देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ३ लाखांपेक्षा कमी झाली आहे. देशात सध्या २ लाख ९९ हजार ६२० रुग्ण उपचाराधीन आहेत. तसेच गेल्या २४ तासांत ३८ लाख १८ हजार ३६२ जणांचं लसीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत ८६ कोटी १ लाख ५९ हजार ११ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.  

राज्यातील करोनाची परिस्थिती..

राज्यात रविवारी ३ हजार २०६  नवे रुग्ण आढळून आले असून ३६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच ३ हजार २९२ बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.२४ टक्के तर, मृत्युदर २.१२ टक्के इतका आहे. नवीन रुग्णांच्या नोंदीसह राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ६५ लाख ४४ हजार ३२५ वर पोहोचली आहे. तर, राज्यात आतापर्यंत करोनामुळे १ लाख ३८ हजार ८७० जणांचा मृत्यू झाला आहे.