पंतप्रधानांशी निर्भीडपणे बोलू शकतील अशा नेत्यांची देशाला गरज आहे असं मत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते एस. जयपाल रेड्डी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळे नेते एकत्र जमले होते. त्याचवेळी मुरलीमनोहर जोशी यांनी हे वक्तव्य केलं. एस. जयपाल रेड्डी यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. एस. जयपाल रेड्डी हे असे नेते होते ज्यांनी कधीही त्यांच्या तत्त्वांशी तडजोड केली नाही.

“एस जयपाल रेड्डी हे असे नेते होते ज्यांनी त्यांना जे वाटलं ते कायम बोलून दाखवलं, आपल्याला जे म्हणणं मांडायचं आहे त्याबाबत पक्षाला काय वाटेल याचा विचार त्यांनी केला नाही. सध्याच्या घडीला अशा नेत्यांची देशाला गरज आहे. निर्भीडपणे पंतप्रधानांसमोर जे बोलू शकतात, त्यांच्याशी चर्चा करु शकतात असे नेते देशाला हवे आहेत”असंही मुरली मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे.

“सध्याच्या घडीला कार्यक्रम घेतले जात नाहीत ज्या कार्यक्रमांमध्ये पक्षाचे धोरण बाजूला ठेवून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर नेते भाष्य करतील. असे कार्यक्रम पुन्हा घेतले जाण्याची गरज आहे. कारण काही असे प्रश्न आहेत जे देशपातळीवर तर काही प्रश्न जगाच्या पातळीवर महत्त्वाचे आहेत. अशात सगळ्या मुद्द्यांची साधकबाधक चर्चा करायची असेल तर असे मुद्दे पक्ष धोरणाच्या कोंदणात बसवता येणार नाहीत. त्यासाठी पक्ष धोरण सोडून नेत्यांनी चर्चा केली पाहिजे” असंही मुरली मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एस. जयपाल रेड्डी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जी सभा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, माकपाचे सीताराम येचुरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.