अयोध्या : “अनेक शतकांपासूनच्या जखमा, वेदना आता भरून निघत आहेत. राम मंदिर बांधकामपूर्तीच्या निमित्ताने संपूर्ण भारताने साजरा केलेला आनंदाचा सोहळा त्याचेच द्योतक असून १९४७ मध्ये महासत्ता होण्याच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
अयोध्येतील राम मंदिराच्या कळसावर भगवा ध्वज फडकावल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे औचित्य साधून पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हा ध्वजारोहण सोहळा पार पडला. या वेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अनेक साधू-महंत उपस्थित होते.
प्रत्येक नवीन पिढीसमोर केवळ आजचे वास्तव मांडणे सयुक्तिक ठरणार नाही. आपण नव्हतो तेव्हापासून हा देश आहे आणि आपण नसू तेव्हाही तो राहणार आहे, असे सांगतानाच मोदी यांनी २०४७ चे महासत्तेचे स्वप्न साकार करण्याच्या प्रवासात भारतीयांच्या आतला ‘राम’ जागृत होण्याची गरज व्यक्त केली.
स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था ११ व्या स्थानी पोहोचली, पण गेल्या ११ वर्षांत आपण पाचव्या स्थानावर पोहोचलो आहोत. संयम, सत्य, सद्वर्तन, सामर्थ्य आणि सचोटी यावर आधारलेला प्रभू श्रीरामचंद्रांचा रथच आता विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक आहे. मुळात राम केवळ एक व्यक्ती नाही; तो नीतिमूल्ये, शिस्त आणि जीवनाला दिशा देणारा आदर्श आहे.
भारताने या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगून मानसिक गुलामगिरी दूर करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करत पुढील दहा वर्षे या परिवर्तनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. भारताने लोकशाहीची संकल्पना परदेशातून आणल्याचा दावा वसाहतवादी विचारातून पुढे आणली गेली, पण मुळात भारतच लोकशाहीचा उद्गाता आहे. प्रत्येक भारतीयाच्या ‘डीएनए’मध्ये लोकशाही आहे, असे मोदी या वेळी म्हणाले.
अभिमानाची बाब – शहा
मानवतेसाठी धर्म आणि कर्म या नीतिमूल्यांचा आदर्श देणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्यात आले आणि आता प्रभू राम – देवी सीता स्वयंवर दिनाचे औचित्य साधून या मंदिरावर धर्मध्वज फडकावण्यात आला, ही सनातन धर्म आणि रामभक्तांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले.
हा सोहळा म्हणजे सांस्कृतिक पुनरुत्थानाचे प्रतीक आहे. राम मंदिरावरील फडकणारा भगवा म्हणजे असत्यावर सत्याच्या विजयाची साक्ष देईल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
